Cyclone Tauktae: मुंबई : तौत्के चक्रीवादळाचा जोरदार तडाखा कोकण किनारपट्टीसह मुंबईला बसला आहे. अनेक भागात सकाळपासून वीज गायब झाली आहे. अशातच मुंबईपासून भर समुद्रात 175 किमी दूर मुंबई हाय फील्डवर 273 जण अडकले आहेत. त्यांची सुखरुप सुटका करण्यासाठी वेगवान वारे आणि अजस्त्र लाटांच्या मध्ये नौदलाने बचाव कार्य सुरु केले आहे. () (On receipt of a request for assistance for Barge 'P305' adrift off Heera Oil Fields in Bombay High area with 273 personnel onboard)
हीरा तेल विहीरीच्या जवळ असलेल्या एका बार्जमध्ये हे सारे अडकले असून सर्वांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नौदलाने त्यांच्या सुटकेसाठी जहाजे पाठविली आहेत. नौदलाने दोन लढाऊ युद्धनौका आयएनएस तलवार आणि आयएनएस कोच्ची मुंबई हाय फील्डच्या दिशेने पाठविली आहेत. ही जहाजे सायंकाळपर्यंत त्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. तसेच आपत्कालीन मदतीसाठी नौदलाने अन्य जहाजे आणि विमानांनाही तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. चक्रीवादळाच्या परिसरात अडकलेल्या या कर्मचाऱ्यांना बचावासाठी आणि शोधासाठी लवकरात लवकर मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
तौत्के चक्रीवादळाचा दुपारी दोन वाजता मुंबईत 114 किमी प्रती तास एवढा प्रचंड वेग नोंदविला गेला. या वादळात आतापर्यंत देशभरात 7 मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी एक मृत्यू हा मुंबईत झाला आहे.
सकाळी दहा वाजेपर्यंत मुंबई शहरासह उपनगरातील बहुतांश ठिकाणांना मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्याने झोडपून काढले होते. सकाळी दहानंतर देखील पावसाचा आणि वादळी वा-याचा वेग कायम होता. परिणामी भल्या पहाटे घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबापुरी सोमवारी मात्र अत्यंत धीम्या गतीने धावत होती. त्यात उपनगरी रेल्वेच्या सेवेत अडथळे आल्याने समस्यांमध्ये आणखीनच वाढ झाली. दुसरीकडे सुरक्षेच्या कारणास्तव मोनो रेलची सेवा देखील खंडित करण्यात आली होती. याव्यतिरिक्त नेहमी भरभरुन वाहणाऱ्या मुंबईच्या रस्त्यांवर आज केवळ पाऊस आणि वारेच धावत असल्याचे चित्र होते.