मुंबई - अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या तौत्के चक्रीवादळामुळे वाहणारे वादळी वारे व जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि मुलुंड येथील जंबो कोविड केंद्रांतील ५८० कोविड रुग्णांचे महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये शनिवारी रात्रीच स्थलांतर करण्यात आले आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळेमुंबईत ताशी सुमारे ६० ते ८० किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्याने, वादळीवारे व मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दहिसर कोविड केंद्रातील १८३, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) केंद्रातील २४३ आणि मुलुंड केंद्रातील १५४ रुग्णांना शनिवारी रात्रीच स्थलांतरित करण्यात आले.
यात अतिदक्षता उपचार, ऑक्सिजन पुरवठा या वर्गवारीप्रमाणे स्थलांतर करताना ऑक्सिजन पुरवणारे सिलेंडर्स, सुसज्ज रुग्णवाहिका, आवश्यकता भासल्यास इंजेक्शन व इतर संयंत्रांसह रुग्णांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले. रुग्ण स्थलांतरित करण्यात आल्यानंतर त्याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांना कळवावी. ज्या रुग्णालयात प्रत्यक्ष स्थलांतर केले आहे, तिथे आवश्यक ती सर्व व्यवस्था उपलब्ध आहे, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असे आदेश अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले होते.