मुंबई : अरबी समुद्रातील ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा मुसळधार पावसासह मोठा तडाखा राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमिवर, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज ठेवण्यात आली आहे. महावितरण भांडूप परिमंडलचे अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर काम करण्यासाठी सज्ज आहेत.
यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी वाशी मंडळात २५ एजेंसी (एकूण मनुष्यबळ २८२), पेण मंडळात ३१ (एकूण मनुष्यबळ ४९९)तर ठाणे मंडळात ४८ (एकूण मनुष्यबळ ६००)असे एकूण १०४ एजन्सीसना (एकूण मनुष्यबळ १३८१) नियुक्त करण्यात आले आहेत. या सर्व एजन्सीसना आवश्यक मनुष्यबळ, सामग्री व वाहनांसह तयार राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.या चक्रीवादळा तोंड देण्यासाठी भांडूप परिमंडलात १९५५ तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये वाशी मंडळात ७३०, पेण मंडळात ५०७, ठाणे मंडळात ७१८ तांत्रिक कर्मचाऱ्यांना समावेश आहे. याशिवाय ११०३ बाह्यस्रोत तांत्रिक कर्मचारी असून वाशी मंडळात ३९८, पेण मंडळात ३९०, ठाणे मंडळात ३१५ बाह्यस्रोत तांत्रिक कर्मचारी आहेत. तसेच आपत्कालीन स्तिथीत कामासाठी वाशी मंडळात २३ वाहन, पेण मंडळात ३८, ठाणे मंडळात ३३ असे एकूण ९४ वाहन तैनात केले आहेत.