मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून पथक येण्याची काही गरज नाही, कारण जे पंचनामा करतील ते तहसीलदार व अन्य अधिकारी करतील, जे मच्छिमारांचे असतील तर त्या संदर्भातील अधिकारी करतात. त्यामुळे यात काही दुमत नसते. झालेल्या नुकसानीची माहिती राज्य शासनाकडे आलेली आहे. हीच माहिती राज्य शासन केंद्र शासनाकडे देते आणि त्यानुसारच पॅकेज जाहीर होते, असे मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
चक्रीवादळाने जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे झाले आहेत. केंद्रसरकारने आधिच पॅकेज जाहीर करायचे होते. किनारपट्टीवरील नागरिकांच्या नुकसानीचा आढावा मी उद्या (गुरूवार) मंत्रिमंडळ बैठकीत मांडेल. चक्रीवादळ झाल्यानंतर घर दुरुस्तीसाठी लागणारी दुकाने उघडी करण्यासाठी सरकार निर्णय घेईल. यासाठी ताडपत्री, पत्रे दुकानं उघडी ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा कॅबिनेटमध्ये करणार आहे, असे अस्लम शेख म्हणाले.
याचबरोबर, चक्रीवादळ नुकसानीबद्दल सर्व पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्याचा आढावा घेतलेला आहे. माझ्याकडे किनारपट्टीवरील मच्छिमार बांधावांची जबाबदारी आहे, त्यांच्या काही बोटींचे नुकसान झालेले आहे. अन्य बाबींचे देखील काही नुकसान झालेले आहे. किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांची जी घरे आहेत, त्यांचे देखील बरच नुकसान झालेले आहे. काही ठिकाणी शेतीचे नुकसान झालेले आहे. या सर्वांचा सविस्तर पंचनामा केलेला आहे. पंचनामा झाल्यानंतर त्याचे अहवाल देखील आलेले आहेत, आणखी प्रलंबित असलेले अहवाल आल्यानंतर अध्यादेशाच्या हिशाबाने त्याची किती नुकसान भरपाई द्यायची ते ठरवण्यात येईल, अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली.
टास्क फोर्सच्या सल्ल्याने १ जूननंतर काही निर्बंध कडक५० टक्के लसीकरण होत नाही तोपर्यंत लोकल ट्रेन सुरू करता येणे शक्य वाटत नाही. लसीकरण जास्तीत जास्त झाल्याशिवाय आम्ही लाॅकडाऊन उठवणार नाही. टास्क फोर्सच्या सल्ल्याने १ जूननंतर काही निर्बंध कडक करण्यात येतील तर काही शिथील करण्याचा निर्णय घेण्यात येईल. मुंबई लसीकरण केंद्राच्या धोरणामुळे अडकणार आहे. केंद्राने धोरण तयार न केल्याने लस खरेदी करणे कठीण झाले आहे. WHO ने धोक्याची सूचना देऊनही मोदी सरकारने दुर्लक्ष केल्याने कोरोनाची दुसरी लाट आली, असेही अस्लम शेख यांनी सांगितले.