Cyclone Tauktae Updates: तौत्के चक्रीवादळ आता मुंबईनजीक येऊन पोहचलं; सध्या नेमकं कुठे आहे?, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 08:31 AM2021-05-17T08:31:06+5:302021-05-17T15:14:31+5:30
‘तौक्ते’ चक्रीवादळ मुंबईच्या समुद्रसपाटीपासून 150 किमी समुद्री भागात असल्याचं सांगण्यात येत आहे. (Cyclone Tauktae)
Cyclone Tauktae Updates:अरबी समुद्रात उठलेले ‘तौक्ते’ चक्रीवादळ (Cyclone Tauktae) गोव्यासह कोकणपट्टीत प्रचंड धुमाकूळ घालत मोठी पडझड करून वायव्येला गुजरातच्या दिशेने पुढे सरकले आहे. त्यामुळे आज मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शनिवारी रात्रीपासून मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोमवारी हे चक्रीवादळ मुंबईच्या समुद्रातून गुजरातकडे वळणार असून, याचा प्रभाव लक्षात घेऊन सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांनादेखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात बहुतेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी वीज खंडित झाली.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर तौक्ते चक्रीवादळात झालं असून अतिशय रौद्र रुप धारण करत हे वादळ आता मुंबईनजीक येऊन पोहचलं आहे. रविवारपर्यंत गोवा, रत्नागिरी आणि उर्वरित कोकण किनारपट्टीवर धुमाकूळ घातलेलं हे वादळ आता काहीसं पुढे सरकलं असून, सध्याच्या घडीला त्याचं केंद्र हे मुंबईच्या समुद्रसपाटीपासून 150 किमी समुद्री भागात असल्याचं सांगण्यात येत आहे.
#Tauktae will spend more than 12 hours as a storm traveling across Saurashtra before weakening to a depression.#CycloneTauktaeupdate#CycloneAlert#CycloneUpdate#CycloneTauktaehttps://t.co/ghryrml8kE
— SkymetWeather (@SkymetWeather) May 17, 2021
सध्याच्या घडीला मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरां मध्ये मोठ्या प्रमाणावर सोसाट्याचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे, तर काही भागांत मुसळधार ते मध्यम स्वरुपाच्या पावसालाही सुरुवात झाली आहे. पुढील ४-५ तास मुंबईत अशीच परिस्थिती कायम राहणार असून, दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तौक्ते चक्रीवादळ मुंबईपासून पुढे उत्तरेकडे सरकणार आहे. पुढे गुजरात दिशेनं या वादळाचे परिणाम दिसण्यास सुरुवात होणार आहे.
Gujarat: Fishing boats in Navsari float on the seashore in the wake of #CycloneTauktae
— ANI (@ANI) May 17, 2021
Visuals from Ojal Machhiwad village pic.twitter.com/f35g2c7Rh3
तत्पूर्वी, रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील किनारपट्टीला वादळाचा जोरदार तडाखा बसला. ताशी १२० ते १३० किलोमीटर वेगाने वारे वाहात होते. अनेक भागातील कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. रत्नागिरी तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या. रविवारी सकाळी ६ ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वीज पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला.
मुंबईसह कोकणाला धोका नाही
चक्रीवादळाचे मार्गक्रमण वायव्येच्या दिशेने होत असल्यामुळे कोकणसह मुंबई किनारपट्टीला ते धडकणार नाही. परंतु गुजरातच्या पोरबंदरसह इतर किनारी भागाला ताशी १७५ किलोमीटर वेगाने धडक देणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळाचा केंद्रबिंदू हा गोवा किनारपट्टी भागातून वायव्येच्या दिशेने पुढे पोहोचला होता. त्यामुळे गोव्यातील प्रभाव ओसरत चालला होता, तर कोकणसह महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात त्याचा प्रभाव अधिक वाढला होता.