Cyclone Tauktae Updates: चक्रीवादळामुळे मुंबापुरी स्लो ट्रॅकवर; वादळी पावसामुळे मुंबईकरांना भरतेय धडकी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 12:47 PM2021-05-17T12:47:18+5:302021-05-17T12:47:37+5:30
Cyclone Tauktae Updates: मुंबई शहरासह उपनगरातील बहुतांश ठिकाणांना मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्याने झोडपून काढले होते.
- सचिन लुंगसे
मुंबई : अरबी समुद्रात उठलेले तौक्ते नावाचे चक्रीवादळ सोमवारी मुंबई लागत दाखल झाले; आणि मुंबईसह ठाणे व पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोमवारी पहाटे चार वाजल्यापासून मुंबईत ठिकाणी वादळी वारे वाहू लागले. सोबतच वेगाने पडणारा पाऊस मुंबईकरांना धडकी भरवून लागला.
सकाळी दहा वाजेपर्यंत मुंबई शहरासह उपनगरातील बहुतांश ठिकाणांना मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्याने झोडपून काढले होते. सकाळी दहानंतर देखील पावसाचा आणि वादळी वा-याचा वेग कायम होता. परिणामी भल्या पहाटे घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबापुरी सोमवारी मात्र अत्यंत धीम्या गतीने धावत होती. त्यात उपनगरी रेल्वेच्या सेवेत अडथळे आल्याने समस्यांमध्ये आणखीनच वाढ झाली. दुसरीकडे सुरक्षेच्या कारणास्तव मोनो रेलची सेवा देखील खंडित करण्यात आली होती. याव्यतिरिक्त नेहमी भरभरुन वाहणाऱ्या मुंबईच्या रस्त्यांवर आज केवळ पाऊस आणि वारेच धावत असल्याचे चित्र होते.
Moderate to intense spells of rain with gusty winds reaching 90-100 kmph is likely to occur at isolated places in the districts of Raigad, Palghar, Mumbai, Thane and Ratnagiri during the next 3 hours: IMD
— ANI (@ANI) May 17, 2021
मुंबई शहर आणि उपनगरात चक्रीवादळाने सोमवारी सकाळपासूनच रुद्रावतार धारण करण्यास सुरुवात केली. रविवारी मध्यरात्री चक्रीवादळाचा प्रवास मुंबईच्या समुद्रातून गुजरात कडे होत असतानाच सोमवारी सकाळी साडेआठ वाजता हे चक्रीवादळ मुंबईपासून अवघ्या १६० किमी अंतरावर दाखल झाले. परिणामी चक्रीवादळाचा जोर वाढत गेला. रविवारी मध्यरात्री एक वाजेपर्यंत केवळ मुंबईत वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने पहाटे तीन वाजता जोर पकडला. सोबत पावसाचे देखील आगमन झाले. सोमवारी पहाटे चार वाजल्यापासून मुंबई शहर आणि उपनगरात वादळी वाऱ्यासह पावसाने आपला खेळ मांडला.
पहाटे चार वाजल्यापासून मुंबईत वेगाने वाहणारे वारे सकाळचे साडेआठ वाजले आणि आणखी वेगाने वाहू लागले. याच वेळी चक्रीवादळ मुंबईपासून १६० किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली. दक्षिण मुंबईच्या समुद्रापासून उत्तरेकडील टोकापर्यंत उसळलेल्या लाटा आणि वेगाने वाहने वारे याच वेळी मुंबईकरांना धडकी भरवत होते. सोमवारी सकाळी मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची हजेरी लागत असतानाच दुपारी बारा वाजेपर्यंत वादळी वाऱ्याचा वेग आणि पाऊस मुंबई शहर उपनगरात व लगतच्या जिल्ह्यात कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. सदर अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात असताना मुंबईत मोठ्या वेगाने वारे वाहत होते. या काळात पावसाचा वेग कमी असला तरी अंगावर येणारे वारे मुंबईकरांना धडकी भरवत होते.
मुंबई शहर आणि उपनगरात समुद्रकिनारी राहत असलेल्या लोकांना ऐनवेळी अडचण होऊ नये मग स्थलांतरित करण्यासाठीची तयारी देखील करण्यात आली होती. विशेषतः आवश्यक म्हणून एनडीआरएफ यांच्या तुकड्या देखील सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. मुंबई महापालिकेसह राज्य सरकारकडून या संदर्भातली तयारी करण्यात आली असतानाच मुंबईच्या उपनगरात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास प्रचंड वेगाने वारे वाहत होते. याच काळात पावसाचे प्रमाण कमी असले तरी वाहत असलेल्या वाऱ्याने काही का होईना धडकी भरत होती. वाऱ्याचा वेग आणि पाऊस वाढत असतानाच मुंबई महापालिकेने मुंबईकर नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले. शिवाय वादळी वारे वाहत असल्याने झाडाखाली उभे राहू नका, असे आवाहन देखील मुंबई महापालिकेकडून नागरिकांना सातत्याने करण्यात येत होते.
#CycloneTauktae | Heavy rain and winds partially hit Mumbai’s Bandra Kurla Complex (BKC) #COVID care centre. pic.twitter.com/Rsdnuj2uJg
— ANI (@ANI) May 17, 2021
मुंबई महापालिकेकडून अशा प्रकारच्या सूचना दिल्या जात असतानाच सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील तीन तासात मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात पावसाचा वेग कायम राहील, असा अंदाज वर्तविला होता. सकाळी साडेनऊ नंतर मुंबईच्या उपनगरात पुन्हा एकदा पावसाने पकडला. बहुतांश ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी कोसळू लागल्या. सरी कोसळत असतानाच दुसरीकडे वाऱ्याचा वेग प्रचंड होता. परिणामी भल्या पहाटे कामावर जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना काही ठिकाणी अडचणींना सामोरे जावे लागले. सकाळपासून सरीवर सरी लागून राहिल्याने कधी नव्हे ते मान्सून आधीच मुंबईचा वेग कधी झाला होता.
मोनो बंद
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने चक्रीवादळामुळे मोनोरेलची सेवा खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रचंड पाऊस आणि वेगाने वाहणारे वारे या सगळ्या घटनांमुळे सोमवारी सकाळी दहा वाजता चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मार्गावर धावणारी मोनो रेलची सेवा खंडित करण्यात आल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले.
पावसाची नोंद वाढत गेली
कुलाबा वेधशाळा येथे सोमवारी सकाळी साडेसहा वाजेपर्यंत २० मिमी एवढ्या पावसाची नोंद झाल्याचे मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या चोवीस तासातील ही सर्वात मोठी नोंद असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.
सी लिंक बंद
दक्षिण मुंबईला जोडणारा सी लिंक चक्रीवादळामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून सोमवारी सकाळी साडेदहा वाजता प्रसार माध्यमांना देण्यात आली. मुसळधार पावसाच्या सरी आणि वेगाने वाहणारे वारे या कारणास्तव सी लिंक प्रवासाकरिता बंद करण्यात आला आहे, असे देखील वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.
देवाचा धावा
मुंबईलगतच्या समुद्रात दाखल झालेल्या चक्रीवादळाचा फटका मुंबईला बसू नये याकरिता मुंबईकर नागरिकांनी देवाकडे धावा केला. मुंबईवर आलेले हे संकट दूर कर, अशी प्रार्थना मुंबईकर नागरिकांनी देवाकडे केली. विशेषतः प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात मुंबईवरील संकट दूर व्हावे यासाठी मंत्रोच्चार सुरू करण्यात आले. मुंबईवरील संकट, विघ्न दूर कर, अशी प्रार्थना गणपती बाप्पा कडे यावेळी करण्यात आली.
मुंबईकरांनो घराबाहेर पडू नका
तौक्ते चक्रीवादळ व पावसाची सुरु असलेली सततधार लक्षात घेता, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेट वे ऑफ इंडियापासून चौपाटीच्या पाहणीला प्रारंभ केला. बृहन्मुंबई महापालिकेने चौपाट्यांवर केलेल्या तयारी कामांचा आढावा घेतला. तसेच मुंबईकर नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे आवाहन केले.