Join us

तौक्ते चक्रीवादळ : विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांकडून पंचनाम्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:06 AM

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकणात मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांसह सत्ताधारी आघाडीतील नेत्यांनी ...

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकणात मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांसह सत्ताधारी आघाडीतील नेत्यांनी तातडीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, कोकणातील उन्मळून पडलेल्या फळझाडांचे शास्त्रोक्त पुनर्जीवन करण्याची मागणी केली आहे. कोकणात फळबागांचे विशेषतः आंबा, नारळ, केळी आदी वृक्षांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हजारो झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे शेकडो बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या सर्व शेतकऱ्यांना तत्काळ मदत करून उन्मळून पडलेली झाडे त्याचठिकाणी शास्त्रोक्त प्रयत्नाने उभी करण्याबाबत शासनाने विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. यासाठी तत्काळ टास्क फोर्स तयार करावे. यात कोकण कृषी विद्यापीठ व या क्षेत्रात काम करणाऱ्या खासगी संस्था आणि मुंबई महानगरपालिकेतील तज्ज्ञांचा समावेश करावा, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

तर तौक्ते चक्रीवादळाने कोकणात झालेल्या नुकसानाचे त्वरित पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे. नसीम खान यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्र लिहिले आहे. तुफानी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबा व केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. घरांचे पत्रे उडून गेले आहेत तर अनेक घरांच्या भिंती पडून मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. तसेच मच्छिमारांच्या बोटींचेही नुकसान झाल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन लवकर नुकसानभरपाई देऊन लोकांना दिलासा द्यावा, असे नसीम खान यांनी पत्रात म्हटले आहे. तर, तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबईच्या ट्रॉम्बे आणि माहुल कोळीवाड्यालाही बसला आहे. ट्रॉम्बे जेट्टीच्या ठिकाणी सुमारे ३० ते ४० बोटींचे नुकसान झाले असून, वादळाच्या तडाख्याने ट्रॉम्बे आणि माहुल कोळीवाड्यातील काही घरांचे नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्त कोळीबांधवांना राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.