लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह उपनगरांत आलेल्या तौक्ते चक्रीवादळासह मुसळधार पावसामुळे दहिसर, कांदिवली आणि मालाड येथील शेकडो झोपड्या उद्ध्वस्त झाल्या. त्यांना सरकारकडून मदत देण्याची घोषणा करीत पंचनामेदेखील करण्यात आले. मात्र अजूनही मदत मिळाली नसल्याने ती कधी मिळणार, असा सवाल झोपडीधारकांकडून केला जात आहे.
वादळात झालेल्या नुकसानानंतर उपनगर जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन नुकसानग्रस्त झोपडीधारकांचे तत्काळ पंचनामे करून त्यांना झोपडी बांधण्यासाठी आर्थिक मदत करण्याची मागणी विविध स्तरांतून केली गेली. घराच्या नुकसानासोबत बरेच नागरिकही यात जखमी झाले. त्यानुसार तलाठी कार्यालयाकडून ठिकठिकाणी भेटी देत पंचनामे जवळपास पूर्ण करण्यात आले असून, बधितांच्या याद्या शासनाकडे पाठविण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र सरकारकडून अद्याप संबंधितांना अर्थिक मदत देण्यात आली नसल्याने बधितांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
मालाडच्या राठोडी परिसरात शेजाऱ्याच्या घराचा पत्र्याचा तुकडा डोक्याला लागून एक महिला जखमी झाली. तर त्याच्याच शेजारी एक घर पूर्ण खचले. यात नशिबाने त्यांचा तीन वर्षांचा मुलगा वाचला; मात्र त्याच्या आईच्या हाताला दुखापत झाली. असे अनेक प्रकार उपनगरात घडले.
आतापर्यंत ३०० पंचनामे पूर्ण
बोरीवली ते गोरेगावपर्यंत तौक्ते वादळात नुकसान झालेल्या ३०० घरांचे पंचनामे आमच्याकडून पूर्ण करण्यात आले आहेत. मात्र अजून सरकारकडून मदत प्राप्त झालेली नाही. ती आमच्याकडे येताच लवकरात लवकर ती संबंधितांपर्यंत पोहोचविण्यात येईल, अशी माहिती बोरीवली तहसीलदार विनोद धोत्रे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.