लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अरबी समुद्रात उठलेल्या बिपोरजॉय या तीव्र चक्रीवादळाने दिशा बदलली असून, त्याने ओमानकडे आगेकूच केली आहे; मात्र चक्रीवादळाचा प्रभाव कायम असल्याने १२ जूनपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करीत ९, १० आणि ११ जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, अरबी समुद्रातील बिपोरजॉय या चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले असून, वाऱ्याचा वेग ताशी १२५ किमी आहे. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. नंतरचे तीन दिवस ते उत्तर पश्चिमेकडे सरकेल. मुंबईपासून हे चक्रीवादळ ९०० किमी दूर गेले आहे. मात्र, मच्छिमारांनी १२ जूनपर्यंत समुद्रात जाऊ नये. ९, १० आणि ११ जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांशी जिल्ह्यांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
कुठे आहे किती तापमान
परभणी ४१ सोलापूर ४० जालना ४० धाराशिव ४० नांदेड ४० सातारा ३७ पुणे ३७ सांगली ३६ नाशिक ३६ मुंबई ३४
४८ तासांत मान्सून केरळमध्ये
दक्षिण अरबी समुद्रावर पश्चिमेकडील वाऱ्याचा वेग कायम राहिला आहे. पश्चिमेकडील वाऱ्याच्या उंचीमध्ये वाढ झाली आहे. अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळ किनाऱ्यावरील ढगाळ वातावरणात वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. - कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, हवामान खाते.