अहमदाबाद/मुंबई : गुजरातच्या काही भागांत गुरुवारी पहाटे ‘वायू’ वादळ धडकणार असल्याने समुद्र किनाऱ्यावरील १.६० लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. गुरुवारी पहाटपर्यंत आणखी दीड लाख लोकांचे स्थलांतर केले जाईल. सौराष्ट्र व कच्छमधील बंदरे व विमानतळांवरे बंद करण्यात आली आहेत.
उद्या अहमदाबाद विमानतळ बंद असेल. मुंबईहूनगुजरातकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्याही उद्या धावणार नाहीत. गुजरातच्या १0 जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा फटका बसेल, अशी शक्यता आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून मुंबई तसेच कोकणपट्टीतील सर्व किनारे लोकांसाठी बंद केले आहेत. खराब हवामानामुळे बुधवारी मुंबई विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आले होते. मुंबईत आज दिवसा जोरदार वारे वाहत होते. समुद्राच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली होती. गोवा, मुंबई, कोकणपट्टी तसेच गुजरातच्या समुद्रात मोठ्या लाटा दिसत होत्या. गुजरातच्या अनेक भागांत जोरदार वारे वाहत होते आणि प्रचंड पाऊसही झाला. वाऱ्यांमुळे अनेक झाडे उन्मळून पडली, झाडांच्या फांद्या, विजेचे खांब, जाहिरातींचे होडिंग्ज खाली आले. हे चक्रीवादळ द्वारका व वेरावल दरम्यान ताशी १५५ ते १६५ किलोमीटर वेगाने धडकेल. गुरुवारी दुपारपर्यंत वेग ताशी १८० किलोमीटर असेल. सौराष्ट्र व कच्छ किनाऱ्यांनाही त्याचा फटका बसेल.
वादळाचा परिणाम हा ते गुरुवारी जमिनीवर धडकल्यानंतरही २४ तास दिसेल. एनडीआरएफच्या ५० तुकड्या गुजरातमध्ये पोहोचल्या असून, लष्कराच्या १० तुकड्या सज्ज आहेत. युद्धनौका व नौदलाची विमानेही तयार ठेवली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊ न मदत व पुनर्वसनात हयगय होऊ नये, असे आदेश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला स्थानिक यंत्रणाच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
चर्चगेटमध्ये होर्डिंगची सिमेंटशीट कोसळून ज्येष्ठाचा मृत्यूमान्सून अद्याप कर्नाटकच्या वेशीवरच असला तरी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘वायू’ चक्रीवादळाच्या पावसाने मुंबईकरांची दैना उडविली आहे. बुधवारी मुंबईत चक्रीवादळाचे वारे वेगाने वाहत असताना चर्चगेट रेल्वे स्थानकावरील होर्डिंगची सिमेंटशीट कोसळून मधुकर अप्पा नार्वेकर (६२) या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. तर, वांद्रे येथील स्कायवॉकचा काही भाग कोसळून तीन महिला जखमी झाल्या. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू या चक्रीवादळाने आपला रोख गुजरातकडे वळविला असला तरी याचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टीवर पावसाचा मारा सुरू आहे. बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबईकरांना सूर्यदर्शन झाले; त्यानंतर मात्र मुंबईवर चक्रीवादळाच्या पावसाचे ढग दाटून आले आणि पाऊस सुरू झाला.
बुधवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास चर्चगेट रेल्वे स्थानकावरील होर्डिंग्जची सिमेंटशीट कोसळून मधुकर अप्पा नार्वेकर (६२) हे ज्येष्ठ नागरिक जखमी झाले. त्यांना जीटी रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण कक्षात उपचारार्थ दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दुपारी ३.३० वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जीटी रुग्णालय प्रशासनाने महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला दिली. या प्रकरणाचा अधिक तपास चर्चगेट रेल्वे पोलीस करीत आहेत. दरम्यान, गोकुळदास तेजपाल रुग्णालयाचे डॉ. प्रीतम शिलवंत यांनी सांगितले की, मधुकर नार्वेकर यांना रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या अंगावर सिमेंटची शीट पडल्याची नोंद आहे. त्यांच्या शरीरावर कापल्याचे व्रण दिसून आले, तसेच रक्तस्त्रावही बराच झालेला होता. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असून अहवाल प्रतीक्षेत आहे. मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला आहे. नार्वेकर (६२) यांच्या नातेवाईकांना मदत म्हणून पाच लाख रुपये पश्चिम रेल्वे प्रशासन देणार आहे. या प्रकरणाची नोंद चर्चगेट लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संबंधित ए ग्रेड अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.७० मेल, एक्स्प्रेस पूर्णपणे रद्दवायू चक्रीवादळाचा फटका सौराष्ट्र, कच्छ, अमरेली, गिर, सोमनाथ, दीव, जुनागढ, पोरबंदर, राजकोट, जामनगर आणि द्वारका या शहरांना बसेल. त्यामुळे पश्चिम मार्गावरून या शहरात जाणाºया ७० मेल, एक्स्प्रेस पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून २८ मेल, एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने अतिदक्षता म्हणून विशेष मेल, एक्स्प्रेस न चालविण्याचा निर्णय घेतला आहे. किनारपट्टी भागातील प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी राजकोट विभागातून एक विशेष गाडी आणि भावनगर विभागातून दोन विशेष गाड्या चालविण्यात आल्या. चक्रीवादळामुळे एकूण ९८ गाड्यांवर परिणाम झाला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिकारी नेमले आहेत.वाऱ्याचा वेग वाढल्याने विमान वाहतूक विस्कळीतमुंबईतील वाऱ्याचा वेग सरासरीपेक्षा जास्त असल्याने मुंबईतील विमान वाहतुकीवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. बुधवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणाऱ्या व उड्डाण होणाऱ्या विमानांना सरासरी अर्धा ते पाऊण तास विलंब झाला. त्यामुळे हवाईमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा फटका बसला.