हवामान खात्याचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हवामानात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर १४ मे रोजीच्या आसपास दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून, ते उत्तर - उत्तर पश्चिम दिशेन पुढे सरकेल. या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर १६ मे रोजी चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, या आठवड्यात अरबी समुद्राच्या किनारी भागात पाऊस होईल. अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाचा फटका १४ ते १६ मे दरम्यान गोव्यासह महाराष्ट्राला देखील बसेल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
१४ ते १६ मेदरम्यान येथील समुद्र खवळलेला राहील. मोठ्या लाटा उसळतील. परिणामी, मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असे आवाहन भारतीय हवामान शास्त्र विभागाने केले आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा विपरीत परिणाम म्हणून लक्षद्वीप, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या किनारी १४ ते १५ मेदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच काळात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील. हवामान बदलाचा फटका गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारी भागालाही बसेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
........................................