लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘यास’ चक्रीवादळामुळे मुंबई विमानतळावरून भुवनेश्वर आणि कोलकात्याला जाणारी सहा विमाने रद्द केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.
यास चक्रीवादळाचा तडाखा संपूर्ण पूर्व किनारपट्टीला बसत आहे. हे वादळ ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडकल्याने सोसाट्याचे वारे आणि मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईहून भुवनेश्वर आणि कोलकात्याला जाणारी विमानसेवा रद्द करण्यात आली. त्यात तीन उड्डाणे आणि चार आगमनांचा समावेश आहे. उर्वरित मार्गावरील सेवा वेळापत्रकानुसार सुरू आहे, अशी माहिती मुंबई विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे भुवनेश्वर विमानतळ २५ ते २७ मेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे, तर झारसुगुडा २६ ते २७ मे, दुर्गपूर आणि राउरकेला २६ मे, तर कोलकाता विमानतळ २६ मे रोजी सकाळी ८.३० ते रात्री ७.४५ पर्यंत बंद ठेवण्यात आले.