अंधेरीतील गाेदामात सिलिंडरचा स्फोट, चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:07 AM2021-02-11T04:07:34+5:302021-02-11T04:07:34+5:30

घटनेची सर्वंकष चौकशी होणार : महापाैर किशाेरी पेडणेकर यांची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अंधेरी पश्चिम येथील यारी ...

Cylinder explodes in Andheri, four injured | अंधेरीतील गाेदामात सिलिंडरचा स्फोट, चार जखमी

अंधेरीतील गाेदामात सिलिंडरचा स्फोट, चार जखमी

Next

घटनेची सर्वंकष चौकशी होणार : महापाैर किशाेरी पेडणेकर यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अंधेरी पश्चिम येथील यारी रोडवरील निवासी भागात असलेल्या एचपी गॅस सिलिंडरच्या गोदामात बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास झालेल्या सिलिंडर स्फोटात चार जण जखमी झाले. चाैघांनाही कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राकेश कडू, लक्ष्मण कुमावत, मनजीत खान, मुकेश कुमावत अशी जखमींची नावे आहेत. ते ४० ते ६० टक्क्यांपर्यंत भाजले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. निरंजन यांनी दिली. दुर्घटनास्थळी स्फोटामुळे लागलेली आग विझविण्यासाठी ८ फायर इंजिन आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. दुपारी दीड वाजता येथील आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीमुळे येथील काही घरांचेही नुकसान झाले.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. जखमी चाैघांचीही कुपर रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. पेडणेकर म्हणाल्या की, निवासी भागात सिलिंडरचा साठा करणे चुकीचे असून, एका व्यक्तीच्या फायद्यासाठी अनेकांचा जीव धोक्यात घालणे ही गंभीर बाब आहे. घटनेची सर्वंकष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

मुंबईत अवैध सिलिंडरचा साठा तसेच ज्वलनशील पदार्थांचा साठा करून ठेवलेल्या ठिकाणांबाबत नागरिकांनी पुढे येऊन महापौर कार्यालयामध्ये तक्रारी द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. तक्रारीनुसार अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिकेचा संबंधित विभाग यांना सोबत घेऊन संबंधितांविरूद्ध कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या दुर्घटनेबाबत सर्व यंत्रणांची आगामी दोन दिवसांत बैठक घेण्यात येणार असून, बैठकीत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित केली जाईल. आगीमुळे नुकसान झालेल्या घरांचीही महापौरांनी यावेळी पाहणी केली. तसेच नुकसान झालेल्या रहिवाशांना मोबदला देण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

....................................

Web Title: Cylinder explodes in Andheri, four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.