सिलिंडर स्फोटात फुगेवाल्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 01:17 AM2017-08-13T01:17:35+5:302017-08-13T01:17:35+5:30
भांडुपमध्ये गॅस फुग्यासाठी वापरण्यात येणाºया सिलिंडरचा शनिवारी स्फोट झाला. या स्फोटात फुगेवाल्याचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले. नादीर वहाब अब्दुल पठाण (२४) असे मृत फुगेवाल्याचे नाव आहे.
मुंबई : भांडुपमध्ये गॅस फुग्यासाठी वापरण्यात येणाºया सिलिंडरचा शनिवारी स्फोट झाला. या स्फोटात फुगेवाल्याचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले. नादीर वहाब अब्दुल पठाण (२४) असे मृत फुगेवाल्याचे नाव आहे.
भांडुपच्या भट्टीपाडा येथे सकाळच्या सुमारास हा स्फोट झाला. पठाण सकाळी नेहमीप्रमाणे फुग्यांमध्ये हायड्रोजन सिलिंडरने गॅस भरत होता. सिलिंडरमधील दबाव वाढल्याने स्फोट झाला आणि सिलिंडर ३०० ते ४०० मीटर उंचावर उडाला. यात पठाणचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे दोन सहकारी सी. अब्दुल खान व धमेंद्र पुराण हरिजन किरकोळ जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवान तेथे दाखल झाले. त्यांनी जखमींना मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. यात काही घरांचेही नुकसान झाले आहे.
गॅस फुगे विकण्याचा पठाणचा व्यवसाय होता. त्याच्याकडे असे पाच ते सहा हायड्रोजन गॅस सिलिंडर होते. घटनास्थळी दाखल झालेल्या पालिका अधिकाºयांनी अन्य हायड्रोजन गॅस सिलिंडर ताब्यात घेतले आहेत. तर स्फोट झालेला सिलिंडर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे. पठाण हा विनापरवाना काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान याप्रकरणी अब्दुलखान, हरिजन यांच्यासह मृत पठाणविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती भांडुप पोलिसांनी दिली असून अधिक तपास सुरू आहे.