छबिलदास शाळेच्या गच्चीवर सिलिंडर स्फोट; तीन जण जखमी, शाळेच्या भिंतींना तडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 01:20 PM2022-11-03T13:20:58+5:302022-11-03T13:25:01+5:30
शिवाजी पार्क पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली.
मुंबई : दादरमधील छबिलदास इंग्लिश मीडियम शाळेच्या गच्चीवर बुधवारी पहाटे गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने दादर हादरले. स्फोटात शाळेच्या कँटीनमध्ये झोपलेले तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने मोठी दुर्घटना टळली. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस अधिक तपास करत आहेत.
शिवाजी पार्क पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली. आगीमध्ये छबिलदास शाळेच्या कँटीनमध्ये झोपलेले केटरिंगचे काम करणारे कामगार भरत जारंग (२५), अली मोहम्मद सज्जाद अली (३८) आणि गोपाल साहू (४०) जखमी झाले. स्फोटाचे वृत्त समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणले. जखमींना तत्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आगीमध्ये गच्चीवरील लोखंडी पत्रे खाली पडल्यामुळे शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या दोन कारचे व एका दुचाकीचे नुकसान झाले. शाळेच्या इमारतीला ठिकठिकाणी तडे गेलेले आहेत. आग सिलिंडरच्या स्फोटामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
दुरुस्ती लवकरच
स्फोट ज्या ठिकाणी घडला त्या भागाची दुरुस्ती करण्याच्या सूचना पालिकेकडून मिळाल्याने संबंधित भागाचे ऑडिट करून दुरुस्ती काम हाती घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती छबिलदास शाळेचे व्यवस्थापकीय समितीतील संचालक शैलेंद्र साळवी यांनी दिली. दिवाळीची सुट्टी संपून शाळा लवकरच सुरू होणार असल्याने दुरुस्तीचे काम लवकर करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.