Cyrus Mistry: 'मी संकल्प करतोय, तुम्हीही प्रतिज्ञा घ्या'; सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूनंतर आनंद महिंद्रांचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 03:10 PM2022-09-05T15:10:26+5:302022-09-05T15:15:53+5:30

सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर प्रसिद्ध उद्योजग आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत एक महत्वाचं आवाहन केलं आहे. 

Cyrus Mistry: Entrepreneur Anand Mahindra vowed to always wear a seat belt from now on. | Cyrus Mistry: 'मी संकल्प करतोय, तुम्हीही प्रतिज्ञा घ्या'; सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूनंतर आनंद महिंद्रांचं ट्विट

Cyrus Mistry: 'मी संकल्प करतोय, तुम्हीही प्रतिज्ञा घ्या'; सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूनंतर आनंद महिंद्रांचं ट्विट

Next

मुंबई- अहमदाबाद महामार्गावर डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ झालेल्या कार दुर्घटनेत टाटा सन्सचे माजी अध्यक्ष, शापूरजी पालनजी उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक, प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (५४) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासह या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वापी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. 

सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचं डॉक्टरांनी कारण सांगितलं आहे. डॉक्टर शुभम सिंह यांनी सांगितले की, सायरस मिस्त्रींच्या डोक्यावर मार बसला होता. मृत्यूचं कारणही तेच असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तसेच अपघात होताच त्यांचा जागीच मृत्यू झाला. जहांगीर पंडोल यांचाही घटनास्थळी मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दोघांना जेव्हा रुग्णालयात घेऊन आले, तेव्हा दोघांचाही मृत्यू झाला होता. 

सायरस मिस्री आणि त्यांच्या सोबतच्या प्रवाशांनी सीट बेल्ट बांधला नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळेच अपघातात सायरस मिस्त्री यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अपघातस्थळीच त्यांचा मृत्यू झाला. सीट बेल्ट न बांधण्याची चूक सायरस आणि त्यांच्यासोबत असलेल्यांच्या जीवावर बेतली आहे. याचपार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योजग आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत एक महत्वाचं आवाहन केलं आहे. 

सायरस मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावला नसल्याची माहिती समोर आल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी यापुढे नेहमी सीट बेल्ट लावणार अशी शपथ घेतली. गाडीच्या मागील सीटवर असतानाही मी नेहमी सीट बेल्ट लावण्याचा संकल्प करत आहे. तुम्ही सर्वांनी ही प्रतिज्ञा घ्या, असं मी आवाहन करतो, असं सांगत आपल्या कुटुंबाला आपण हे देणं लागतो, असंही आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे. 

सायरस मिस्त्रींची संपत्ती किती?

२०१८ मध्ये सायरस यांची एकूण संपत्ती ७०,९५७ कोटी रुपये होती. ते पत्नी रोहिका छागला यांच्यासोबत मुंबईतील एका आलिशान घरात राहत होते. मुंबईसह आयर्लंड, लंडन आणि दुबईमध्येही त्यांचे निवासस्थान आहे.

दिखावूपणा टाळला-

टाटा समूहाचे सर्वेसर्वा झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सायरस मुंबईतील टाटा मुख्यालय बॉम्बे हाऊसमध्ये आले तेव्हा ते साध्या पँट-शर्टमध्ये होते, तर त्यांचे स्वागत करणारे लोक सूट-बूट घालून आले होते. त्याच्या शर्टच्या बाह्या दुमडलेल्या होत्या आणि काही बटणे उघडी होती.

जगात शोधाशोध अन्...

रतन टाटा यांचा उत्तराधिकारी निवडणे हे टाटा सन्ससाठी अवघड काम होते. सदस्यांनी योग्य व्यक्तीच्या शोधात जगभर प्रवास केला. इंद्रा नुयी यांच्यासह इतर १४ जणांमध्ये यासाठी स्पर्धा होती. या सर्वांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र, त्यानंतर सर्वानुमते सायरस यांची निवड करण्यात आली. सायरस हे नोएल टाटा यांचे मेहुणे होते.

Web Title: Cyrus Mistry: Entrepreneur Anand Mahindra vowed to always wear a seat belt from now on.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.