डी. के. रावच्या कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 05:08 AM2017-10-19T05:08:24+5:302017-10-19T05:08:31+5:30
खंडणीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला गँगस्टर छोटा राजनचा जवळचा साथीदार समजल्या जाणा-या डी. के. राव याची पोलीस कोठडी २३ आॅक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
मुंबई : खंडणीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला गँगस्टर छोटा राजनचा जवळचा साथीदार समजल्या जाणा-या डी. के. राव याची पोलीस कोठडी २३ आॅक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितल्याने न्यायालयाने त्यांची मुदतवाढीची विनंती मंजूर केली.
डी. के. रावला गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी १२ आॅक्टोबरला अटक केली आहे. मुंबईतील धारावी परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (एसआरए) एका प्रकल्प सल्लागाराकडे त्याने ५० लाखांची खंडणी मागितली होती. व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याच्या कोठडीची मुदत २३ आॅक्टोबरपर्यंत वाढवली.
अनेक गुन्हे दाखल
डी. के. राव याच्यावर खून, खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी एका खंडणीच्या गुन्ह्यातून मुक्तता झाल्यानंतर त्याने पुन्हा एकदा बिल्डर, उद्योजकांना धमकावून खंडणी गोळा करण्यास सुरुवात केली होती.