मुंबई : तरुणांनी रक्ताचे नाते जपत रविवारी 'लोकमत'च्या रक्तदान महायज्ञात उत्स्फूर्त सहभाग घेतला. 'रोटरॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट' यांच्या सहकार्याने अंधेरी पश्चिम येथील डी. एन. नगरमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ४४ युनिट रक्तसंकलन करण्यात आले.
कोरोनाकाळात राज्यात ठिकठिकाणी रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘लोकमत’ने ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार, रविवारी डी. एन. नगरमध्ये रोटरॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर पार पडले.
स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'लोकमत'ने हाती घेतलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. देशावर रक्तसंकट घोंगावत असताना 'लोकमत'ने राज्यभर रक्तदान शिबिरे आयोजित करून नवा आदर्श निर्माण करून दिला आहे. आम्हालाही या उपक्रमाचा भाग होता आले याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया रोटरॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टचे अध्यक्ष हृतिक शुक्ला यांनी व्यक्त केली.
रोटरॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या समुदाय सेवा संचालक खुशी तेजवानी म्हणाल्या की, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कारण आपल्यामुळे अनेक लोकांचा जीव वाचतो. यासाठी कोणतेही अधिकचे कष्ट लागत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने नियमित रक्तदान करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. खुशी यांनी या शिबिराच्या संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली.
.......
कोरोना संकट असेपर्यंत रक्ताचा तुटवडा जाणवत राहणार आहे. त्यामुळे 'लोकमत'ने ही मोहीम आणखी काही दिवस सुरू ठेवावी. आमच्यासारख्या तरुणांसाठी असे उपक्रम प्रेरणादायी ठरतात, आम्हाला त्यात उत्स्फूर्तपणे भाग घेता येतो.
- परम पारीख, रोटरॅक्ट क्लब
......
फोटोओळ - 'लोकमत'च्या रक्तदान महायज्ञात सहभाग घेणारी रोटरॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टची युवाशक्ती. (डावीकडून) रिषभ शाह, मानव पटेल, हर्ष कुमार, हृतिक शुक्ला, परम पारीख, अमोघ शेट्टी, अदनान वहनवती, मीत शाह, केल्विन पिंटो, श्रुती शाह, खुशी तेजवानी, खुशी बंग.