डबेवाले बनणार पोलिसांचे माहीतगार
By admin | Published: September 14, 2015 03:15 AM2015-09-14T03:15:53+5:302015-09-14T11:39:33+5:30
मुंबईकरांचे उदरभरण करणाऱ्या डबेवाल्यांचा सर्वाधिक संबंध हा रेल्वेशी येत असतो. जर त्यांनी चौकस नजरेने लक्ष दिले तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलिसांचे
मुंबई : मुंबईकरांचे उदरभरण करणाऱ्या डबेवाल्यांचा सर्वाधिक संबंध हा रेल्वेशी येत असतो. जर त्यांनी चौकस नजरेने लक्ष दिले तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलिसांचे ते माहीतगार होऊ शकतात, असे आवाहन मधुकर पाण्डेय यांनी केले. सेंट जॉर्जेस हॉस्पिटल येथे रेल्वे पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीसमित्र परिसंवाद शनिवारी पार पडला. त्यावेळी मधुकर पाण्डेय बोलत होते. या परिसंवादात मुंबईच्या डबेवाल्यांना सहभागी करण्यात आले होते. लोकलशी डबेवाल्यांचा फार जवळचा संबंध असतो. रेल्वे स्टेशन, लोकलमध्ये संशयास्पद हालचाली वा वस्तू आढळल्यास त्याची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, जेणेकरून भविष्यात होणाऱ्या दुर्घटना टळू शकतील. या परिसंवादाच्या माध्यमातून पाच हजार डबेवाल्यांना सुरक्षेच्या दृष्टीने सजग करण्यात आले. हल्ली दहशतवादीकृत्यासाठी सायकलींचा वापर करण्यात येतो. त्यामुळे डबेवाल्यांनी सायकल उभी करताना सगळ््यांना पाहता येईल, अशा ठिकाणी उभी करावी, असेही आवाहन करण्यात आले.
यावेळी रेल्वे पोलिसांच्या बॉम्बशोधक आणि नाशकपथकातर्फे (बीडीडीएस) सादरीकरण करण्यात आले. त्यात बॉम्बचे स्वरूप याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या परिसंवादात मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे सल्लागार सोपान मरे, शुभाष तळेकर, उपायुक्त रुपाली अंबुरे, उपायुक्त दीपक देवराज आदी उपस्थित होते.