Join us

डबेवाला भवनाचा लवकरच मेकओव्हर; दोन कोटी रुपयांतून रुपडे पालटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 7:07 AM

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आता या भवनाचे रूप बदलण्यात येणार आहे.

मुंबई : वांद्रे-मुंबई येथील डबेवाला भवनाचे रुपडे आता पालटणार आहे. त्यासाठी भाजपचे विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी त्यांच्या आमदार निधीतून दोन कोटी रुपये दिले आहेत. या कार्याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अलीकडेच झाले. 

मुंबई आणि डबेवाले यांचे अतूट असे नाते. प्रतिकूल हवामान असो की इतर कोणतेही अडथळे असोत; डबेवाल्यांच्या सेवेत कधी खंड पडला नाही. मुंबई डबेवाला संघटनेचे वांद्रे येथे भवन आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आता या भवनाचे रूप बदलण्यात येणार आहे. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी ते एक आकर्षण केंद्र असेल. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली. डबेवाले हे मुंबईचे खरे वैभव असल्याचे ते म्हणाले. 

असे असेल डबेवाला भवन आता डबेवाला भवनात एक सेल्फी पॉइंट असेल. तिथे डबेवाल्यांबरोबर सेल्फी घेता येईल. अन्नदान-महादान या संकल्पनेबाबत माहिती दिली जाईल. डबेवाला ही संकल्पना मुंबईत कधी व कशी आली आणि आजवरचा त्यांचा प्रवास याची माहिती या ठिकाणी असेल. डबेवाले त्यांचे कठीण काम योग्य व्यवस्थापनाद्वारे दररोज कसे करतात, याची सचित्र माहिती असेल. डबेवाल्यांना आतापर्यंत जगभरात कसे गौरविण्यात आले, याची माहितीही असेल. डबेवाल्यांनी वापरलेल्या सायकली, टिफिन, त्यांचे गणवेश आणि अन्य वस्तूंची एक  कायमस्वरूपी प्रदर्शनी असेल. त्यांचे जीवनचरित्र असलेले टी-शर्ट, कप, डायरी, टोप्यांच्या विक्रीचे दालन असेल. डबेवाला भवनात डबेवाल्यांच्या जीवनाचा अनुभव तुम्हाला घेता येईल. 

अ डे विथ डबावालाडबेवाल्यांचा दिनक्रम कसा असतो, डबे पोहोचविण्याचे त्यांचे कौशल्य प्रत्यक्ष अनुभवण्याची संधीदेखील मिळणार आहे. ‘अ डे विथ डबावाला’ या उपक्रमांतर्गत कोणालाही एक दिवस त्यांच्यासोबत फिरता येईल.