मुंबईचा डबेवाला करणार ऑनलाइन फूड डिलिव्हरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:06 AM2021-05-29T04:06:10+5:302021-05-29T04:06:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोणत्याही परिस्थितीत वेळेवर डबे पोहोचवून मुंबईकरांची भूक भागवणारा मुंबईचा डबेवाला आता हॉटेलमधील ऑनलाइन फूड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोणत्याही परिस्थितीत वेळेवर डबे पोहोचवून मुंबईकरांची भूक भागवणारा मुंबईचा डबेवाला आता हॉटेलमधील ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणार आहे. मुंबईतील काही हॅाटेलमालकांनी ठराविक डबेवाल्यांना पार्सल ऑर्डर डिलिव्हरी करण्याचे काम देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या डबेवाल्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे मोठे हाल झाले आहेत. अनेक कार्यालये बंद असल्याने डबेवाल्यांचा व्यवसाय बंद झाला आहे. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. लॅाकडाऊन कालावधीत हॅाटेल व्यवसाय बंद आहे; परंतु या निर्बंधांमध्ये हॉटेल व्यावसायिकांना ऑनलाइन फूड डिलिव्हरी करण्याची मुभा आहे; पण ऑनलाइन पार्सल ॲार्डर घरोघरी पोहोचविण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांना मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. ही कमतरता आता मुंबईच्या डबेवाल्यांनी दूर केली आहे. मुंबईतील काही हॅाटेलमालकांनी ठराविक डबेवाल्यांना पार्सल ऑर्डर डिलिव्हर करण्याचे काम देण्यास सुरुवात केली आहे.
* हाताला काम मिळणे गरजेचे
सध्या डबे पोहोचविण्याचा व्यवसाय बंद आहे. यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उदरनिर्वाहासाठी हाताला काम मिळणे गरजेचे आहे. डबे पोहोचविण्याचा व्यवसाय पूर्णपणे सुरू होत नाही, तोपर्यंत डबेवाले अशाच नवनव्या रोजगाराच्या संधी शोधून आर्थिक गरज पूर्ण करत राहतील.
- कैलास शिंदे, डबेवाला.
.......................................................