मुंबई : मुंबईचे डबेवाले गेली १२६ वर्षे मुंबईत डबे पोहोचवण्याचे काम करत आहेत. मात्र, आता नव्या काळाशी सुसंगत होऊन डबेवाल्यांनी कुरिअरच्या क्षेत्रातही पदार्पण केले आहे. डबेवाल्यांच्या व्यवसायातून पुरेसे उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे हा नवा मार्ग पत्करल्याचे डबेवाले सांगतात. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विश्वातील हे पाऊल डबेवाल्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करेल, अशी आशा आहे.डबेवाल्याने घरातून जेवणाचा डबा घेतल्यानंतर तीन तासांत तो डबा कार्यालयात पोहोचविण्यात येतो. याच धर्तीवर ज्या दिवशी कुरिअर घेतले त्याच दिवशी त्याची डिलीव्हरी करण्यात येणार आहे. ‘डिजिटल इंडिया’शी हातमिळवणी करीत एका कुरिअर कंपनीसाठी डबेवाले काम करणार आहेत. त्यात मोबाइल अॅपच्या साहाय्याने ही सेवा कार्य करेल. त्या अॅपच्या आधारे डबेवाल्याचे लोकेशन कंपनीला व ग्राहकांना कळणार आहे. जो डबेवाला जवळ असेल त्याला त्या कुरिअरचे कॉल मिळणार आहेत. या कामी विशाल मेहता हे डबेवाल्यांना सक्रिय मदत करत आहेत. लवकरच मान्यवरांच्या हस्ते या अॅपचे अनावरण होईल. जे डबेवाले कुरिअर क्षेत्रात येत आहेत त्यांना दादर येथे विशेष ट्रेनिंग देण्यात येत आहे.या व्यवसायातून मिळणाºया आर्थिक लाभातून ५ टक्के रक्कम गरीब, गरजू डबेवाल्यांच्या मुलांना देण्यात येईल. त्याचप्रमाणे, मुंबईचे डबेवाले डिजिटल डबेवाले झाले आहेत. ‘डिजिटल डबावाला’ या वेबसाइटच्या माध्यमातून डबेवाले सात सेवा आॅनलाइन देत आहेत. यामध्ये एकने वाढ करून विवाह नोंदणी प्रमाणपत्रही आता डबेवाले आॅनलाइन काढून देणार आहेत. मल्हार नेचर डॉट कॉमच्या माध्यमातून मुंबईचे डबेवाले मुंबईकरांना शुद्ध, नैसर्गिक भाजी पुरवत आहेत.काळाप्रमाणे डबेवाल्यांच्या सेवेतच केवळ मर्यादित न राहता डबेवाल्यांनी बदलण्याचा निर्धार केला आहे. त्याप्रमाणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकून त्याप्रमाणे आम्हीही प्रशिक्षित होत आहोत. जेणेकरून समाज, तंत्रज्ञान ज्या वेगाने बदलते आहे त्याप्रमाणे सामान्य डबेवालाही ‘अपडेट’ होईल. बदलत्या गतिमान समाजाचा वेग पकडण्यासाठी स्वत:ला अद्ययावत करणे ही काळाची गरज डबेवाल्यांनी ओळखली आहे.- सुभाष तळेकर, प्रवक्ते, मुंबईचे डबेवाले संघटना
डबेवाले देणार कुरिअर सेवा, ‘डिजिटल इंडिया’शी हातमिळवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:36 AM