Join us

डबेवाले करणार उपोषण

By admin | Published: May 29, 2017 4:52 AM

मराठा आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने ३० मे रोजी मुंबईतील आझाद मैदान ते मंत्रालय अशा धडक मोर्चाची

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठा आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने ३० मे रोजी मुंबईतील आझाद मैदान ते मंत्रालय अशा धडक मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाला मुंबईच्या डबेवाल्यांनी पाठिंबा घोषित केला आहे. शिवाय मोर्चानंतरही मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा निर्णय घेतला नाही, तर बेमुदत उपोषणात डबेवालेही सामील होणार आहेत.मुंबई डबेवाले असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे धडक मोर्चा व बेमुदत उपोषणाची हाक दिलेली आहे. त्याला प्रतिसाद देत डबेवाल्यांनी मोर्चामध्ये सामील झाल्यानंतर एक दिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे डबेवाल्यांचे प्रतिनिधी म्हणून माझ्यासह अर्जुन सावंत, दशरथ केदारी, विठ्ठल सावंत, रामदास करवंदे, रोहिदास सावंत हे एक दिवसीय उपोषण करतील. मुंबईचे डबेवाले हे मावळ मराठा असून आरक्षणाच्या सुविधेअभावी डबेवाल्यांच्या मुलांना शिक्षण व नोकरीच्या पुरेशा संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी निघणाऱ्या सर्व प्रामाणिक आंदोलनांत मुंबईचे डबेवाले आघाडीवर असतील, अशी प्रतिक्रिया तळेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मोर्चाचे समन्वयक संभाजी पाटील म्हणाले की, म्मंगळवारी, ३० मे रोजी दुपारी १२ वाजता मराठा समाज आझाद मैदान येथे जमा होईल. तेथून कोणत्याही परिस्थितीत मंत्रालयावर मोर्चा धडक देईल. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मोर्चानंतर बेमुदत उपोषणास बसतील.बाइक रॅलीमोर्चाबाबत जनजागृती होण्यासाठी महामोर्चाला पाठिंबा देण्यासाठी डोंबिवली येथे बाइक रॅलीचे आयोजन केल्याची माहिती मोर्चाचे समन्वयक संदीप जाधव यांनी दिली. डोंबिवलीतील बाइक रॅली सकाळी ७ वाजता सुरू होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाइक रॅलीला सुरुवात होणार आहे.