ढोल पथकांसाठी धावले मुंबईचे डबेवाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:08 AM2021-07-14T04:08:24+5:302021-07-14T04:08:24+5:30
मुंबई : मागील काही वर्षांपासून ढोल पथक आणि गणेशोत्सव यांचे अनोखे समीकरण बनले आहे. यामुळे मुंबईसारख्या शहरात गणेशोत्सवात आगमन ...
मुंबई : मागील काही वर्षांपासून ढोल पथक आणि गणेशोत्सव यांचे अनोखे समीकरण बनले आहे. यामुळे मुंबईसारख्या शहरात गणेशोत्सवात आगमन व विसर्जन मिरवणुकांमध्ये ढोल पथकांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून या ढोल पथकवाल्यांचा व्यवसाय संपूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे ढोल पथकांनादेखील आर्थिक अनुदान देण्याची मागणी मुंबईच्या डबेवाल्यांनी केली आहे.
डबेवाल्यांनी आपली परंपरा, खेळ यांची संस्कृती मुंबईत जपली आहे. मुंबईत पुणेरी ढोल पथक ही संकल्पना सर्वप्रथम डबेवाल्यांनीच आणली. जसे गणेशोत्सवाचे स्वरूप पालटत गेले तशी ढोल पथकांना मागणी वाढत गेली. मुंबईत गणपती मिरवणुकीत एक तास ढोल वाजवायची १० ते १५ हजार रुपये बिदागी मिळते. यामुळे ही ढोल पथके आर्थिकदृष्ट्या सक्षम होत गेली. मावळची ही वादक मंडळी पुण्या- मुंबईत १० दिवस मुक्काम ठोकून असतात. मुंबईत एखादी खोली किंवा हॉल दोन आठवड्यांसाठी भाड्याने घेतला जातो. तिथे सगळी वाद्ये ठेवली जातात. खाद्य सामान गावाकडून आणले जाते. गहू, तांदूळ, डाळ, तिखट मसाला सोबत ठेवला जातो.
डबेवाले आणि त्यांच्या गावातील अनेक ढोल पथके मुंबईत कार्यरत आहेत. ही ढोल पथके गावच्या विकासात हातभार लावतात. परंतु कोरोनामुळे या पथकांची कमाई बंद झाली. ही पथके आर्थिकदृष्ट्या संकटात सापडली. यासाठीच या ढोल पथककांना सरकारने आर्थिक अनुदान द्यावे, अशी मागणी डबेवाल्यांनी केली आहे.
गेल्यावर्षी गणेशोत्सव व नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा झाला. त्यामुळे ढोल पथकाचे ढोल ताशे गेले वर्षभर अडगळीत पडून होते. हे ढोल दुरुस्त करण्यासाठी आता ढोल पथकाकडे निधी नाही. या ढोल पथकांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपली आहे. आज ढोल पथके आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. सरकारने या ढोल पथकांना अनुदान म्हणून आर्थिक मदत करावी.
- सुभाष तळेकर, अध्यक्ष, मुंबई डबेवाला असोशिएशन