मुंबई : फेरीवाला धोरणाकरिता फेरीवाल्यांचे सव्रेक्षण सुरू आहे. मात्र या फेरीवाला सव्रेक्षणाचा डबेवाल्यांना मनस्ताप होतो आहे. डबेवाल्यांसाठी या फेरीवाला धोरणात ठोस नियमावली नसल्यामुळे चिंतेत असणा:या डबेवाल्यांना सव्रेक्षणादरम्यान अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते आहे. त्यामुळे ही शर्यत पार करण्यासाठी डबेवाल्यांनी पालिकेसमोर अडचणी मांडल्या आहेत.
डबेवाला प्रामुख्याने मुंबईत जेवणाचे डबे पोहोचवत असला तरी त्याचे कार्यक्षेत्र एमएमआरडीच्या क्षेत्रएवढे आहे. उदा. डबेवाला राहतो विरारला, डबे घेतो मीरा-भाईंदरला आणि पोहोचवितो नरिमन पॉइंटला. त्यामुळे डबेवाल्यांनी फेरीवाला परवाना मिळवण्यासाठी कोणत्या महानगरपालिके कडे अर्ज करायचा, असा प्रश्न डबेवाल्यांना पडला आहे. शिवाय, डबे पोहोचविण्याचे काम हे संघटितरीत्या करत असल्याने या फेरीवाला धोरणात समूह परवाना पद्धतीचा समावेश नाही. तसेच एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस फेरीवाला धोरणात ग्राह्य धरले जाणार आहे. परंतु डबेवाल्यांचा व्यवसाय कौटुंबिक असल्याने एकाच वेळी वडील, मुलगा, भाऊ व्यवसायात कार्यरत आहेत. त्यामुळे या समस्येतूनही मार्ग कसा काढणार, याचा विचार डबेवाले करत आहेत. डबेवाल्यांना या फेरीवाला धोरणात समाविष्ट करून घेण्यासाठी मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली होती. या भेटीत धोरणाविषयीच्या अडचणी मांडण्यात आल्या होत्या, तसेच मुख्यमंत्री चव्हाण यांनी याविषयी पालिकेच्या अधिका:यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. (प्रतिनिधी)