डबेवाल्यांची आता ‘कपडा बँक’
By admin | Published: October 10, 2016 03:54 AM2016-10-10T03:54:39+5:302016-10-10T03:56:55+5:30
मुंबईकरांचे ‘उदरभरण’ करता-करता डबेवाल्यांनी कायम सामाजिक भानही राखले आहे. समाजाने केलेल्या ऋणांची परतफेड करण्यासाठी विविध उपक्रम राबवून मुंबईचे डबेवाले
मुंबई : मुंबईकरांचे ‘उदरभरण’ करता-करता डबेवाल्यांनी कायम सामाजिक भानही राखले आहे. समाजाने केलेल्या ऋणांची परतफेड करण्यासाठी विविध उपक्रम राबवून मुंबईचे डबेवाले हातभार लावत असतात. उरलेल्या अन्नाचे महत्त्व जाणून गेल्या काही महिन्यांपासून डबेवाल्यांनी ‘रोटी बँक’ सुरू केली. या उपक्रमाला सर्व घटकांतून मिळालेल्या प्रतिसादानंतर आता ‘कपडा बँक’च्या माध्यमातून मुख्य प्रवाहापासून दुर्लक्षित असणाऱ्या आदिवासींना मदत करण्याचे डबेवाल्यांनी ठरविले आहे.
घरातील जुने, वापरात नसलेले कपडे डबेवाल्यांना देण्याचे आवाहन डबेवाले संघटनेने केले असून, दिवाळीचे औचित्य साधून हे कपडे पालघर, जव्हार, मोखाडा, तलासरी या आदिवासी पाड्यांतील लोकांना वितरित केले जातील. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक समस्यांच्या वेढ्यात अडकलेल्या आदिवासी दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी दिवाळीला डबेवाल्यांनी दुष्काळग्रस्त भागात फराळाचे वाटप केले होते. तसेच, डबेवाल्यांनी दुष्काळग्रस्त कुटुंबातील महिलेला भाऊबिजेची भेट म्हणून साडी दिली होती. यंदा ‘कपडा बँक’च्या उपक्रमात डबेवाल्यांना हातभार लावण्यासाठी जुने कपडे द्यायचे असतील तर प्रत्येक रेल्वे स्थानकात सकाळी ८ ते १० व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत डबेवाले हजर असतात; त्या वेळी जुने कपडे डबेवाले स्वीकारतील. त्याचप्रमाणे डबेवाले संघटनेचे भाऊ करवंदे ८०८२८९०८२६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)