दाभोळमध्ये डोंगरात वहाळाचा प्रवाह बदलला
By admin | Published: June 25, 2015 11:04 PM2015-06-25T23:04:20+5:302015-06-25T23:04:20+5:30
. डोंगर कोसळल्याचे कारण शोधण्यासाठी पुणे येथील भूगर्भशास्त्रज्ञांना पाचारण करण्यात येणार असून या वहाळाच्या प्रवाहाची पाहणीसुद्धा केली जाणार आहे.
दापोली : दाभोळ टेमकरवाडीच्या डोक्यावर प्रचंड मोठा डोंगर आहे. या डोंगराच्या मध्यभागातून एक वहाळ वाहतो. पूर्वी या डोंगरावर भातशेती केली जात होती. त्यामुळे या वहाळाचे पाणी इतरत्र फिरवले जात होते. त्यामुळे डोंगरातून वाहणाऱ्या या वहाळाचे पाणी डोंगराखाली फारसे येत नव्हते. परंतु अलीकडे डोंगरावरील भातशेती बंद झाल्याने वहाळाचे पाणी डोंगरातून टेमकरवाडीच्या मध्यभागातून जात होते. वहाळाच्या पाण्याने अलीकडे प्रवाह बदलल्यामुळे डोंगरातून झरेच झरे पाझरत होते. त्यामुळेच दरड कोसळून घरे जमिनीखाली गाडली गेली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र दुर्घटना कशामुळे घडली, याचा शोध घेण्यासाठी भुगर्भ शास्त्रज्ञांना पाचारण करण्यात येणार आहे. दाभोळ ढोरसई परिसराच्या माथ्यावर उंच मोठा डोंगर आहे. हा डोंगर १० वर्षापूर्वी एका खासगी कंपनीने विकत घेतला होता. जेटी बांधण्याकरिता या डोंगरातील दगडाला ड्रील मशीनने भले मोठे भूसुरुंग केले होते. त्यामुळे २००८ला ढोरसई भागातील व टेमकरवाउीतील काही घरांना तडे गेले होते. याची नुकसानभरपाईसुद्धा कंपनीने दिली होती. यानंतर गेली पाच वर्षे काम बंद असल्याने पुढील कोणताही धोका झाला नव्हता. परंतु डोंगराचा एक भाग पोखरल्याने व भूसुरुंग लावून स्फोट केल्यानेच डोंगराला हादरे बसून डोंगराने दुसऱ्या बाजूचा भाग सोडला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून कंपनीने केलेल्या उत्खननामुळे ही दुर्घटना घडल्याची तक्रार ग्रामस्थानी पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्याकडे केली. तेव्हापासूनच हा डोंगर धोकादायक बनल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या. असे असले तरीही डोंगर कशामुळे कोसळला याबाबत कोणतीही वाच्यता करणे सध्यातरी योग्य होणार नाही. डोंगर कोसळल्याचे कारण शोधण्यासाठी पुणे येथील भूगर्भशास्त्रज्ञांना पाचारण करण्यात येणार असून या वहाळाच्या प्रवाहाची पाहणीसुद्धा केली जाणार आहे. या डोंगरावरील उत्खननाची तीव्रता या दुर्घटनेपर्यंत पोहोचली होती का? भू सुरुंगाची तीव्रता व त्यामुळे या डोंगराला धोका निर्माण झाला होात का? यावर सखोल अभ्यास करुन योग्य तो निष्कर्ष वर्तवला जाणार आहे. (प्रतिनिधी)
वैभवला शोक अनावर
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कमलाकर महाडीक यांचा मुलगा वैभव आॅस्ट्रेलियातून दाभोळमध्ये दाखल झाला. परदेशात असल्यामुळे त्याला आईवडिलांचे अंत्यदर्शनसुद्धा घेता आले नाही. वैभव आल्यावर शोकाकूल अंत:करणाने घटनास्थळी जाऊन आला. झाल्या प्रसंगाने त्याला शोक अनावर झाला. त्याच्या डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा वाहू लागल्याने उपस्थितांची मनेही हेलावली.
रत्नागिरी जिल्ह्यातील धोकादायक डोंगराचा भूगर्भ सर्वे करुन धोकादायक घरांना स्थलांतरीत करुन त्याचे पुनर्वसन करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री रविंद्रवायकर यांनी दाभोळ येथे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धोकादायक ोंगरांचा सर्वे होण्याची शक्यता असून भविष्यातील असे प्रकार टाळण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात येणार आहे.