Dabholkar Murder Case: स्फोटक प्रकरणातील आरोपींचा दाभोलकर हत्याकांडाशी संबंध, आणखी दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 12:01 AM2018-09-09T00:01:46+5:302018-09-09T00:06:00+5:30
नालासोपारा स्फोटक प्रकरणात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतलेल्या वासुदेव भगवान सूर्यवंशी यांच्यासह त्याचा मित्र विजय उर्फ भैया उखर्डू लोधी या दोघांना शनिवारी अटक केली.
मुंबई : नालासोपारा स्फोटक प्रकरणात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतलेल्या वासुदेव भगवान सूर्यवंशी यांच्यासह त्याचा मित्र विजय उर्फ भैया उखर्डू लोधी या दोघांना शनिवारी अटक केली. रविवारी दोघांनाही सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सूर्यवंशी याने अंनिसचे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडादरम्यान वाहनाची व्यवस्था केल्याचा संशय आहे.
एटीएसने आतापर्यंत या प्रकरणी वैभव राऊत, शरद कळस्कर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर आणि अविनाश पवार या पाच जणांना अटक केली आहे. त्यानंतर आता हा आकडा सातवर गेला आहे. अटक आरोपीकडून जप्त केलेल्या दस्ताऐवजातून या सूर्यवंशीचे नाव समोर आले. त्यानुसार गुरुवारी साकळी गावातून सूर्यवंशीला ताब्यात घेतले. त्याने राज्यभरातील विविध कारवायांसाठी वाहन व्यवस्था केल्याचा संशय आहे.
त्यांच्याकडून काही सीडी जप्त करण्यात आली आहेत. त्यामध्ये विविध ठिकाणांच्या रेकीचा समावेश आहे. शिवाय यात पुण्यातील सनबर्न फेस्टिवलच्या ठिकाणाचाही समावेश आहे. त्याच्या गॅरेजमधून ही सीडी जप्त करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीत त्याचा मित्र विजय उर्फ भैया उखर्डू लोधी याचे नाव समोर आले. शुक्रवारी सायंकाळी कारवाईसाठी आलेल्या एटीएसच्या पथकाने कुटुंबीयांना बाहेर काढून विजय लोधी याची घरातच सुमारे तासभर चौकशी केली. त्यानंतर त्याला मुंबईत आणले. या कारवाईमुळे गावात तणावाचे वातावरण आहे.