डबेवाल्यांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 11:57 PM2020-03-02T23:57:43+5:302020-03-02T23:57:49+5:30
महाराष्ट्राची शान असलेल्या डबेवाल्यांचेही आता गिरणी कामगारांप्रमाणे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
मुंबई : महाराष्ट्राची शान असलेल्या डबेवाल्यांचेही आता गिरणी कामगारांप्रमाणे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. शासनाकडून त्यांना ठाणे जिल्ह्यातील चार ठिकाणांच्या जागांचे प्रस्ताव दिल्यानंतर, नुकतीच त्या जागेची पाहणी डबेवाल्यांच्या शिष्ट मंडळाने केली असून, त्या जागाही डबेवाल्यांना पसंत पडल्या असल्याचे डबेवाल्यांकडून सांगण्यात आले.
मॅनेजमेंट गुरू म्हणून जगभर ज्यांची कीर्ती पसरली आहे, अशा मराठमोळ्या मुंबईच्या डबेवाल्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. गेल्या १३० वर्षांपासून जेवणाचे डबे पोहोचविण्याचे काम करणाऱ्या डबेवाल्यांचे मुंबईत स्वत:च्या मालकीचे घर नव्हते. मागील अनेक वर्षांपासून त्यांची शासनाकडे घरासाठीची मागणी प्रलंबित होती. मागील सरकारकडून त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर घराचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा वाढली. यासाठी नुकतीच डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन घरांसाठी जमिनीची मागणी केली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महसूल, गृहनिर्माण आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत डबेवाल्यांसमवेत भेट घडवून, ताबडतोब पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरांचा प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले. यावेळी महसूल खात्याकडून त्यांना ठाणे जिल्ह्यातील कल्याण, बदलापूर आणि अंबरनाथ येथील चार जमिनींचे प्रस्ताव दिल्यानंतर गुरुवारी डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असल्याची माहिती डबेवाल्यांनी दिली.