'आबा आज तुमची आठवण येतेय, राज्याला आपणच पाहिजे होता'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 09:12 AM2021-03-21T09:12:20+5:302021-03-21T09:12:34+5:30
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या हफ्त्याची मागणी केल्याचे गंभीर आरोप झाल्यानंतर अनेकांना दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांची आठवण झाली आहे.
मुंबई - माजी मुंबई पोलीस आयुक्त यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. मुंबई आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग नाराज असून, पदभार न घेताच ते रजेवर गेले आहेत. दरम्यान, त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मोठा आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. त्यानंतर, विरोधकांनी सरकारला आणि गृहमंत्र्यांना धारेवर धरलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही अतिशय धक्कादायक घटना असल्याचं म्हटलंय.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या हफ्त्याची मागणी केल्याचे गंभीर आरोप झाल्यानंतर अनेकांना दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांची आठवण झाली आहे. आर.आर. पाटील यांचा कार्यकाळ हा गृहखात्याचा सर्वोत्तम काळ होता, त्यांच्या काळातच गरिबांची, शेतकऱ्यांच हजारो पोरं पोलीस दलात भरती झाली. राज्यात डान्सबार बंदीचा निर्णयही आबांनीही घेतला होता. त्यावेळी, धनदांडग्या डान्सबारवाल्यांच्या विरोधाला झुगारुन शेतकऱ्याच्या पोरानं गृहमंत्री काय असतो हे देशाला दाखवून दिलं होतं. त्यामुळेच, अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर अनेकांनी आंबाची आठवण काढली.
आबा आज तुमची खूप आठवण येतेय,
— Vinod Patil (@vnpatilofficial) March 20, 2021
गृहमंत्री म्हणून राज्याला आपणच पाहिजे होता...😥 pic.twitter.com/kW5OdGGHRN
मराठा आरक्षणातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आपल्या ट्विटरवरुन आर.आर. पाटील यांच्यासमेवतचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच, या फोटोसमेवत कॅप्शनही दिलंय.
आबा आज तुमची खूप आठवण येतेय,
गृहमंत्री म्हणून राज्याला आपणच पाहिजे होता..., असे विनोद पाटील यांनी म्हटलंय.
फडणवीसांकडून राजीनाम्याची मागणी
परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. सिंग यांचे आरोप फक्त खळबळजनक नाहीत, तर ते अतिशय धक्कादायक आहेत. डीजी दर्जाचा अधिकारी इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलात धक्कादायक घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होत आहेत. पण ही घटना म्हणजे या प्रकरणातला कळस आहे, असं फडणवीस म्हणाले. तर, दुसरीकडे अमृता फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत ट्विट केलंय. फडणवीस यांच्याप्रमाणेच अनेक भाजपा नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण सोडले असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं होतं.
संजय राऊत म्हणतात
संजय राऊत यांनी शनिवारी रात्री पत्रकारांशी बोलताना, मला याबाबत माहिती नाही, या आरोपांची मला कल्पना नाही. त्यामुळे, मला सध्या काहीही बोलायचं नाही, असे म्हटले होते. त्यानंतर, राऊत यांनी आज सकाळी ट्विट करत आपलं मत व्यक्त केलंय. त्यांनी नेहमीप्रमाणेच शायरीतून अंदाजे बयाँ.. अशारितीने सर्वांनाच संभ्रमात टाकलंय.
हमको तो तलाश बस नये
रास्तों की है
हम है मुसाफिर ऐसे जो मंझिल से
आए है...
असे ट्विट राऊत यांनी केलंय. त्यामुळे, राऊत यांच्या या ट्विटचा अर्थ काय घ्यायचा असा प्रश्न अनेकांना पडलाय. तर, प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार या शायराना ट्विटचा अर्थ घेत आहे.
जयंत पाटील म्हणतात...
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेली स्फोटके व त्यानंतर झालेल्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. यातून कोणीही सुटू नये, यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचे पत्र म्हणजे कोणाची तरी सहानुभूती मिळवून या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचाच प्रकार आहे, असा आरोप जलसंपदामंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत केला