पप्पा, यात सर्व पुरावे आहेत; सोडू नका त्याला..!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 08:33 AM2022-01-25T08:33:00+5:302022-01-25T08:33:43+5:30
मोबाइल पासवर्ड लिहीत मुलीची आत्महत्या
मुंबई : ‘पप्पा, यात सर्व पुरावे आहेत, सोडू नका त्याला’ या वाक्याने सुसाईड नोटचा शेवट करत स्वतःच्या मोबाइलचा पासवर्ड त्यावर लिहून जोगेश्वरीत जान्हवी विजय चव्हाण (२१) तरुणीने गळफास घेत आयुष्य संपविले. रविवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला असून, मेघवाडी पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तसेच या प्रकरणी निखील या तरूणाला ताब्यात घेतले आहे.
जोगेश्वरीच्या रामवाडी परिसरात जान्हवी वडिलांसोबत राहत होती. तिच्या आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे मोठ्या मुलाचे वर्षभरात लग्न लावून देण्यात आले, तो आता विरारला राहतो. पदवीच्या शिक्षणानंतर जान्हवी अंधेरीच्या कोविड लसीकरण केंद्रात अटेंडंट म्हणून काम करत होती. पालिकेच्या जल विभागात फिटर म्हणून काम करणारे तिचे वडील विजय हे कामानिमित्ताने सतत बाहेर असायचे. त्यामुळे जान्हवी घरी एकटी असायची. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांनी दरवाजा ठोठावला, मात्र जान्हवीने तो उघडला नाही. त्यामुळे त्यांनी खिडकीतून पाहिले तेव्हा गळफास घेतलेल्या अवस्थेत जान्हवी त्यांना दिसली. याबाबत त्यांनी आरडाओरडा केल्यावर स्थानिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघडून तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण यांच्या घराच्या झडतीत पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. त्यात जान्हवीने निखिल आणि त्याची बहीण अक्षया यांची नावे देत त्यांनी त्रास दिल्याचे म्हटले आहे. तिने स्वतःच्या मोबाइलचा पासवर्ड देत त्यात सर्व पुरावे असून, त्यांनी तिला फसवले आणि निखिलने बाहेर संबंध ठेवले, त्याला सोडू नका असे वडिलांना उद्देशून लिहिले आहे. त्यानुसार पोलीस तपास करत संबंधितांवर जान्हवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘मला एकटं वाटायचं तेव्हा...’
nघरी सापडलेल्या जान्हवीच्या सुसाईड नोटमध्ये ती एकटेपणानेही त्रासली असल्याचे उघड होत आहे. आई नव्हती, वडील कामासाठी बाहेर, तर भाऊ सोबत राहत नव्हता.
nअशात ती एकटी पडली होती. तिने सुसाईड नोटमध्ये ‘सॉरी पप्पा, तुम्हाला एकटे सोडून गेली. मला जायचं नव्हतं; पण सहन होत नव्हतं. मी त्याच्यावर खूप प्रेम केलं, त्याच्याशिवाय माझं कोणी नव्हतं.
nमला एकटं वाटायचं तेव्हा मी त्याला फोन करायची; पण तो माझ्या भावनांशी खेळला आणि घरच्यांचे कारण देत मला सोडलं. आय लव्ह यू पप्पा, काळजी घ्या’ असे लिहिले आहे.
तिने निखिलबाबत उल्लेख केला नाही :
माझ्या बायकोचे निधन झाल्यावर वर्षभरात मुलाचे लग्न आम्ही लावले. त्यावेळी घराचे रंगकामासाठी तिने निखिल या मित्राची मला ओळख करून दिली. मात्र त्यानंतर त्याच्याबाबत काहीच उल्लेख तिने केला नाही. त्या दिवशी ती भावाकडे जाणार होती म्हणून मी सांताक्रुझला भावाकडे गेलो. रविवारी घरी परतलो आणि हे समोर आले. - विजय चव्हाण, जान्हवीचे वडील