मराठीसाठी आईपेक्षाही बाबा जास्त आग्रही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 06:07 AM2019-09-17T06:07:41+5:302019-09-17T06:07:45+5:30
मातृभाषा मुलांना शिकविण्यासाठी आई जास्त आग्रही असलेली दिसून येते.
- सीमा महांगडे
मुंबई : मातृभाषा मुलांना शिकविण्यासाठी आई जास्त आग्रही असलेली दिसून येते. मात्र, मराठी शाळा आपण टिकविल्या पाहिजेत, या फेसबुक समूहाच्या सदस्य संख्येच्या नव्या आकडेवारीनुसार आईपेक्षा विद्यार्थ्यांच्या बाबांना मराठीविषयी जास्त प्रेम असल्याचे समोर आले आहे. या फेसबुक समूहातील एकूण सदस्य संख्येपैकी २५ ते ३४ वयोगटांतील तब्बल ३३.५ टक्के संख्या पुरुषांची आहे, तर ३५ ते ४४ वयोगटांतही पुरुषांचीच सदस्य संख्या महिलांपेक्षा जास्त आहे.
मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर असताना, मराठी शाळांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती व्हावी, यासाठी फेसबुकवर मराठी शाळा टिकविल्या पाहिजेत, हा फेसबुक समूह काही मराठीप्रेमींनी सुरू केला आणि त्याला जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आजघडीला या फेसबुक समूहाची सदस्यसंख्या ५६ हजारांहून अधिक असून, याचे सदस्य भारतासह युके, जर्मनी, नायजेरिया, बांगलादेश, इजिप्त, ओमन, सौदी अरब यांसारख्या अनेक देशांत आहेत. या सर्व देशांतील एकूण सदस्यसंख्येत पुरुषांची संख्या ७९.२ टक्के तर महिलांची संख्या २०.८ टक्के इतकीच आहे. मराठी व मातृभाषेच्या संवर्धनसाठी खरे तर महिलाही आग्रही आहेत. मात्र, त्यांचा प्रत्यक्ष सहभाग मात्र कमी दिसून येत असल्याची प्रतिक्रिया या समूहाचे संस्थापक सदस्य प्रसाद गोखले यांनी दिली. या फेसबुक समूहाच्या फेसबुक एक्टिव्हिटीचा विचार केला असता, पोस्ट्स, कमेंट्स आणि रिअॅक्शन्स साऱ्याच बाबतीत हा समूह कमालीचा ट्रेंडिंगमध्ये असतो. त्यामुळे भविष्यात मराठी शाळांच्या भवितव्यासाठी मराठी शाळा टिकविला पाहिजेत, या फेसबुक समूहाचा विशेष सहभाग आहे, असे निश्चित म्हणता येईल, असे मत गोखले यांनी व्यक्त केले.
>समूहाचे मुंबईतून २७ हजार सदस्य
समाज माध्यमावर ५६,००० सदस्यांच्या समूहाने गेली ५ वर्षे सातत्याने हा विषय मांडल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे प्रसाद गोखले यांनी सांगितले. भारतातील या समूहाची सदस्यसंख्या ५६ हजारांहून अधिक असून, मुंबई शहरातील सदस्यसंख्या २७ हजारांहून अधिक आहे. त्यानंतर, ठाणे, नाशिक आणि नवी मुंबईतील सदस्यसंख्या अधिक असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.