मुंबई - भारत सरकारच्या यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये, महाराष्ट्रातील एकमेव परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केद्र सरकारने १०६ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. त्यामध्ये, दिलीप महालनोबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर करण्यात आला आहे. यंदा ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ९१ नागरिकांना पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात येत आहे. त्यामध्ये, विदर्भाचे दादा कोंडके अशी ओळख असलेल्या परशुराम खुणे यांनाही यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात १० जणांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.
विदर्भाचा दादा कोंडके म्हणून प्रसिद्ध असलेले विनोदवीर डॉ. परशुराम खुणे यांनी सतत ४५ वर्षे झाडीपट्टी रंगभूमीची सेवा केली. झाडीपट्टीसाठी त्यांनी केलेल्या या ‘कलादाना’ची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना सांस्कृतिक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. गणपतराव बटपल्लीवार यांच्यानंतर सांस्कृतिक पुरस्कार पटकावणारे खुणे ‘दादा’ हे दुसरे कलाकार ठरले आहेत. त्यांच्या कलाक्षेत्रातील याच कार्याची दखल घेत आता, भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले जात आहे.
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉ. खुणे यांनी आतापर्यंत ८०० हून अधिक नाटकांचे ५ हजारांहून अधिक प्रयोग केले आहेत. १९७५ मध्ये डाकूच्या जीवनावरील ‘येळकोट मल्हार’ या नाटकातील पोलिसाच्या विनोदी भूमिकेतून त्यांनी धमाल उडवून दिली होती. डॉ. खुणे हे उत्तम जादूगार असून त्यांनी आपल्या या कलेचा उपयोग अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी केला आहे. २० वर्षे गुरनोली ग्रामपंचायतचे सरपंच राहिलेले डॉ. खुणे शेतीत अनेक उपक्रम राबवून शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कारही पटकावला आहे. दहा वर्षे झाडीपट्टी कला निकेतन मंचाचे अध्यक्ष राहिलेल्या डॉ. खुणे यांना झाडीपट्टी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होण्याचाही मान मिळाला आहे.
दरम्यान, ‘संगीत एकच प्याला’मधील तळीराम, ‘संगीत लग्नाची बेडी’मधील अवधूत, ‘सिंहाचा छावा’मधील शंखनाद, ‘लावणी भुलली अभंगाला’मधील गणपा या त्यांच्या गाजलेल्या भूमिका आहेत.