पालिकेत तक्रार दिली म्हणून फेरीवाले करताहेत दादागिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 04:25 AM2018-08-19T04:25:25+5:302018-08-19T04:25:43+5:30
वरळीतील गावडे मंडईतील गाळेधारक भीतीच्या छायेखाली
- अजय परचुरे
मुंबई : वरळीतील बाळकृष्ण गावडे व्यापारी मंडईला पडलेला अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा सुटण्याचे चिन्ह नाही. येथे अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापालिकेच्या जी-साऊथ वॉर्ड विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईही केली. मात्र, ही कारवाई केवळ दोन तासांचे नाटक ठरले. मात्र, आपल्याविरूध्द पालिकेत तक्रार केल्याचे समजल्यापासून हे फेरीवाले गावडे मंडईतील व्यापाºयांवर दादागिरी करत आहेत, त्यांना त्रास देत आहेत. त्यामुळे आम्ही सर्व व्यापारी भयभीत झालो आहोत आणि याला सर्वस्वी महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत, अशी चिंता गावडे
व्यापारी मंडईतील व्यापारी किशोर गावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
मंडईसमोरच्या अनधिकृत फेरीवाल्यांना हटवताना पालिकेने अधिकृतपणे गाळे चालवणाºया दुकानदारांवरही कारवाईचा केली. महापालिकेच्या या अजब कारभारामुळे गावडे मंडईतील व्यापारीही संभ्रमात पडले. दुसरीकडे कारवाई झाल्यानंतर फक्त दोन तासांतच अनधिकृत फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान मांडले. यानंतर गावडे मंडईचे सर्व व्यापारी जी साउथ वॉर्डचे सहायक आयुक्त देवेंद्र जैन यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
‘आम्हांला दरवेळी थातूरमातूर आश्वासने दिली जातात. त्यापलीकडे काही केले जात नाही’, असा आरोप किशोर गावडे यांनी केला आहे. २०१५ पासून सतत या फेरीवाल्यांना हटविण्यासाठी पालिकेच्या जी-साउथ वॉर्ड विभाग कार्यालयात येथील व्यापाºयांनी खेटे घातले आहेत; परंतु तात्पुरती कारवाई करण्यापलीकडे पालिकेने काहीही केलेले नाही. पालिकेचे आणि फेरीवाल्यांचे काही साटेलोटे आहे का, असा सवाल गावडे मंडईतील व्यापाºयांनी उपस्थित केला आहे.
धमकीसत्र : अनधिकृत फेरीवाल्यांनी आपल्यावर झालेल्या कारवाईचा राग मनात ठेऊन गावडे मंडईतील अधिकृत गाळे धारकांना धमकावण्यास सुरवात केली आहे. मंडईत जाणारी प्रमुख वाट अडवून त्यावरच दुकाने थाटण्यात आली आहेत. तसेच ग्राहकांना मंडईत येण्यासही मज्जाव केला जातो. येता जाता आमच्या व्यापाºयांना अडवून धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे आम्ही याविरूध्द पोलिसांत तक्रार करणार आहोत. आम्ही भयभीत झालो असून, पालिकेने वेळीच याकडे लक्ष देऊन कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी गावडे मंडईतील व्यापाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
पालिका अधिकारी अजूनही नॉट रिचेबलच
‘लोकमत’ने ही बातमी प्रसारित केल्यापासून याबाबत जी साउथ वॉर्डचे सहायक आयुक्त देवेंद्र जैन यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र याबाबत बोलण्यासाठी ते अजूनही उपलब्ध झालेले नाहीत.