दादर येथील बंगला : महापौर बंगल्याचा वाद अखेर मिटला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 04:14 AM2018-11-07T04:14:05+5:302018-11-07T04:14:29+5:30
मलबार हिलमधील बंगल्याचा हट्ट सोडून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पालिकेच्या बंगल्यात जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर अखेर तयार झाले आहेत.
मुंबई - मलबार हिलमधील बंगल्याचा हट्ट सोडून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पालिकेच्या बंगल्यात जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर अखेर तयार झाले आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला महापौर बंगल्याचा वाद आता मिटला आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाने महापौर निवासस्थानाचा ताबा अखेर बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासकडे आज दिला.
शिवाजी पार्क येथील महापौरांच्या निवासस्थानाची जागा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षी पालिका महासभेत मंजूर करण्यात आला. ११ हजार ५०० चौ.मीटरचा हा बंगल्याचा परिसर ३० वर्षांच्या भाडेकरारावर नाममात्र एक रूपयात देण्याचा निर्णय सुधार समितीने घेतला. मात्र महापौरांसाठी तेवढ्याच साजेसे निवासस्थान मिळत नसल्याने स्मारकाचे कामही लांबणीवर पडले होते. विद्यमान महापौरांनी राणीच्या बागेतील बंगल्यात जाण्यास नकार दिला होता. तसेच मलबार हिल येथे सनदी अधिकारी प्रवीण आणि पल्लवी दराडे राहत असलेल्या पालिकेच्या बंगल्यावर दावा केला होता. मात्र दराडे दाम्पत्यांकडून तो बंगला रिकामा करून घेण्याचे पालिकेचे सर्व प्रयत्न हरले. त्यामुळे बंगल्याचा वाद चिघळला होता. अखेर महापौर महाडेश्वर यांनी माघार घेत राणीबागेत स्थालंतरीत होण्याची तयारी दाखविल्याने हा वाद मिटला आहे.
अखेरचा सार्वजनिक कार्यक्रम\
महापालिकेने हा बंगला १९६२ मध्ये खरेदी केला होता. दादर चौपाटीचे सौंदर्य लाभलेल्या या ऐतिहासिक बंगल्यात मुंंबईच्या महापौरांचे निवासस्थान आहे. त्यामुळे दिवाळीच्या पूर्वसंध्येला या बंगल्यात रंगलेला दिवाळीनिमित्तचा कार्यक्रम अखेरचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला आहे.
विद्यमान महापौर राणीच्या बागेतील बंगल्यात स्थलांतरीत झाल्यानंतर ही जागा खऱ्या अर्थाने स्मारक समितीच्या ताब्यात जाणार असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.
पालिकेच्या मालमत्ता आणि सामान्य प्रशासन विभागातील अधिकाºयांनी शिवाजी पार्क येथील बंगल्याचा ताबा आज सकाळी स्मारकाच्या अधिकाºयांकडे सोपविला. शिवसेनेचे नेते आणि औद्योगिक मंत्री सुभाष देसाई या वेळी उपस्थित होते.