मुंबई - दादरच्या सेनापती बापट मार्गावर गाडी धुण्याच्या बेकायद व्यवसायाचा पदार्फाश करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. गटाराच्या मॅनहोलमधून पाणी उपसून गाडया धुतल्या जात होत्या. धक्कादायक बाब म्हणजे हे रोखण्याची जबाबदारी असलेले पोलीसच तिथे आपली गाडी धुत होते. सेनापती बापट मार्गावरील मॅगनेट मॉलसमोर हा प्रकार सुरु होता.
रविवारी शिवसेनेचे माहिमचे नगरसेवक आणि माजी महापौर मिलिंद वैद्य तिथून जात होते. त्यावेळी त्यांनी हा संपूर्ण गैरप्रकार आपल्या मोबाइल कॅमेऱ्याने शूट केला व संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. मॅनहोलचे झाकण उघडून गटाराच्या पाण्याने गाडया धुतल्या जात असल्यामुळे तिथे अस्वच्छता पसरते, रोगराईला निमंत्रण मिळते असा मुद्दा मिलिंद वैद्य यांनी उपस्थित केला.
मिलिंद वैद्य हे माहिम भागातील कार्यक्षम नगरसेवक म्हणून ओळखले जातात. त्यांची जागरुकता आणि तत्परतेमुळे दुसऱ्याच दिवशी डांबर टाकून हा मॅनहोल बुजवण्यात आला आहे.