दादर चौपाटी स्वच्छतेचे १०० आठवडे; दोन हजार टन कचरा केला गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 04:11 AM2019-07-22T04:11:43+5:302019-07-22T04:11:50+5:30
चित्रपट कलाकारांंचा मोहिमेत सहभाग
मुंबई : बीच वॉरियर्स संस्थेच्या स्वयंसेवकांनी दादर चौपाटीची स्वच्छता करण्याचा विडा उचलला आहे. रविवारी या स्वच्छता मोहिमेला १०० आठवडे पूर्ण झाले. त्यानिमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता यांनीही दादर चौपाटी स्वच्छता मोहिमेला हातभार लावला. आतापर्यंत दादर चौपाटीवरून दोन हजार टन कचरा गोळा करण्यात आला आहे. याची सुरूवात नोव्हेंबर २०१७ रोजी करण्यात आली होती.
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता यांनी यासंदर्भात सांगितले की, सद्यस्थितीला पर्यावरण धोक्यात आहे. त्यामुळे मुंबईकरांसह तरूणांनी पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी हातभार लावणे गरजेचे आहे. पर्यावरणासाठी प्लॅस्टिक हा घटक हानिकारक ठरत आहे. जागतिक तापमान वाढ ही जगभर पसरलेली मोठी समस्या आहे. भविष्यात मुबलक प्रमाणात पाणी मिळणार नाही. पर्यावरण सुरक्षेसाठी जास्तीत जास्त स्वच्छता केली पाहिजे. तसेच समुद्र किनारे स्वच्छ ठेवले आवश्यक आहे.
शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन एनएसएस स्वयंसेवक आणि इतर पर्यावरणप्रेमींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यावेळी कित्येक टन कचरा जमा करण्यात आला असून त्यामध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण अधिक होते. स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी ३ हजार मुंबईकरांनी नोंदणी केली होती.
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे, २०० पोलीस अधिकारी व अंमलदार, मुंबई महानगरपालिकेचे १०० अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत वांद्रे हिल रोड, लकी जंक्शनपासून वांद्रे पोलीस ठाण्यापर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.