मुंबई : लोअर परळ (डिलाईल रोड) पुलाच्या ना. म. जोशी मार्गावरील पश्चिम बाजू ते गणपतराव कदम मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर आता दादरकडून करी रोडच्या दिशेने जाणारी आणखी एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या मार्गिकेच्या काँक्रीटीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून, पुन्हा एकदा दादर - करी रोड दरम्यानचा प्रवास सुसाट होणार आहे.
लोअर परळ पश्चिमेला सेनापती बापट मार्ग जंक्शन येथून येणाऱ्या गणपतराव कदम मार्गावर उर्मी इस्टेट आणि पेनिनसुला कॉर्पोरेट पार्क येथून रेल्वे स्पॅनपर्यंतची मार्गिका वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार यापूर्वीच खुली करण्यात आली आहे. याच पुलावर पुढे डावीकडे ना. म. जोशी मार्गावर वेस्टर्न रेल्वे वर्कशॉप आणि दादरच्या दिशेने जाणारी मार्गिका ही वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. डिलाईल रोड पुलाच्या कामातील पूर्वेच्या दिशेची कामे पूर्ण करून पूर्व दिशेची मार्गिका जुलैअखेरीस सुरू करण्याचा पालिकेच्या पूल विभागाचा प्रयत्न होता. मात्र, काही कारणास्तव वेळापत्रक काहीसे गडबडले.
पुलाखाली अतिरिक्त भुयारी मार्ग
जुना लोअर परळ पूल हा मातीचा भराव आणि दगडी बांधकामाद्वारे बांधण्यात आला होता. त्यामुळे बाजूचे सेवा रस्ते अरुंद होते. तसेच या मार्गामधून क्रॉसिंगसाठी फक्त एक भुयारी मार्ग उपलब्ध होता. परंतु, आता नव्याने बांधण्यात येणारा लोअर परळ पूल स्टील गर्डर वापरून बांधण्यात येत असल्यामुळे पुलाखाली क्रॉसिंगसाठी मुबलक जागा उपलब्ध असणार आहे. तसेच बाजूचे सेवा मार्ग हे पूर्वीपेक्षा रुंद असणार आहेत.