मुंबईत दादर येथील प्रसिद्ध भरतक्षेत्र साडीच्या दुकानावर सक्तवसुली संचालनालयाकडून धाड टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारात ईडीचे अधिकारी दादर पूर्व येथील भरतक्षेत्र दुकान आणि दुकान मालकाच्या कार्यालयात पोहोचले. अधिकाऱ्यांकडून दुकानाचे मालक मनसुख गाला यांची चौकशी केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या पाच तासांपासून ईडीचे अधिकारी दुकानात झाडाझडती घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भरतक्षेत्र साड्यांच्या दुकानांचे मालक मनसुखलाल गाला आणि दिनेश शाह यांच्या विरोधात २०१९ साली आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल झाला होता. याचप्रकरणात ईडीनं एन्ट्री घेत चौकशीला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे.
दादर पूर्वेला असलेलं भरतक्षेत्र हे साडी खरेदीसाठी ओळखलं जाणारं प्रसिद्ध दुकान आहे. लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी भरतक्षेत्रच्या दुकानांमध्ये खूप गर्दी असते. ग्राहक खरेदीसाठी दुकानाबाहेर लोक अक्षरश: रांग लावून उभे असतात. याच परिसरात 'भरतक्षेत्र'ची दोन ते तीन दुकानं आहेत.