सचिन लुंगसे।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दादर पूर्वेकडील जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपुलाखाली एफ/दक्षिण विभागातील कचरा वर्गीकरण संकलन बांधकामामुळे स्वच्छतेऐवजी अस्वच्छता पसरू लागली आहे. मुंबई महापालिकेकडे याबाबत तक्रारी करण्यात आल्या असून, उद्यानासाठीच्या जागेवर लवकरच उद्यान बांधण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
केंद्र, राज्य सरकार आणि महापालिका स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम विस्तृत प्रमाणावर राबवत आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपुलाखाली कचरा वर्गीकरण केंद्र उभारणीच्या कामाच्या स्वच्छतेऐवजी अस्वच्छता पसरू लागली आहे. उड्डाणपुलाखाली उद्यान, बगीचे तयार करण्याची गरज असताना येथे मात्र कचरा वर्गीकरणाचा घाट घातला जात आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मिलिंद मुरारी पांचाळ यांनी सांगितले.
मुळात या पुलाखाली उद्यान प्रस्तावित असतानाही हिंदमाता येथील पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होण्याकरिता ज्या ठेकेदाराला काम दिले आहे त्याची चौकी या उड्डाणपुलाखाली देण्यात आली. ठेकेदाराने कामासाठी वापरण्यात येणारे साहित्य येथे ठेवले आहे. याच व्यतिरिक्त हा उड्डाणपूल मद्यपी आणि गर्दुल्ले यांचा अड्डा बनला आहे. एखादी घटना घडल्यास याची संपूर्ण जबाबदारी मनपा आणि पोलीस प्रशासनाची आहे. या उड्डाणपुलाखालून अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुले-मुली ये-जा करत असतात. त्यामुळे याकडे लक्ष द्यावे, असेही पांचाळ यांनी म्हटले आहे.
स्वच्छतेऐवजी अस्वच्छता पसरू लागली आहे. उड्डाणपुलाखाली उद्यान, बगीचे तयार करण्याची गरज असताना येथे मात्र कचरा वर्गीकरणाचा घाट घातला जात आहे.