मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ चं रुंदीकरण केलं जाणार आहे. त्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक २ आता १५ सप्टेंबरपासून बंद केला जाणार आहे. यामुळे दादरहून सुटणारी 'दादर स्लो' लोकल आता बंद होणार आहे. याच 'दादर लोकल' आता परळ स्थानकातून सुटणार आहेत. त्यामुळे दादर लोकल पकडणाऱ्या प्रवाशांना परळ स्थानक गाठवं लागणार आहे.
दादर स्थानक हे मुंबई लोकल मार्गावरील अत्यंत महत्वाचं स्थानक आहे. स्थानकात नेहमीच गर्दी असते. गर्दी टाळण्यासाठी प्रवासी दादरहून सुटणाऱ्या स्लो लोकलचा मार्ग निवडतात. पण आता तिच दादर स्लो लोकल बंद होणार असल्यानं प्रवाशांची अडचण होणार आहे. फ्लॅटफॉर्मच्या रुंदीकरण्याच्या कामाला किमान दोन महिने लागणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. यासाठी १ कोटी रुपयांचा खर्च अंदाजित आहे. तर या कामामुळे १ नंबरचा फ्लॅटफॉर्म १०.५ मीटरनं अधिक मोठा केला जाणारय. तसंच या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना सरकते जिने उपलब्ध करुन देण्याचाही रेल्वेचा प्रयत्न आहे. यामुळे प्लॅटफॉर्मवरील गर्दी विभागणार असून काम पूर्ण झाल्यावर प्रवाशांना दिलासा मिळेल असा विश्वास रेल्वे प्रशासनाला आहे. पण हे काम पूर्ण होईपर्यंत मुंबईकरांना कळ सोसावी लागणार आहे.
या कामाचा परिणाम म्हणजे फ्लॅटफॉर्म क्रमांक २ वर येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा एकूण २२ लोकल फेऱ्या आता दादर ऐवजी परळ स्थानकातून सुटणार आहेत. पुढील सुचनेपर्यंत दादर लोकल आता परळ स्थानकातूनच सोडण्यात येणार आहे.