मुंबई : मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांक १चे रुंदीकरण केले जाणार आहे. त्यासाठी या फलाटाला जोडून असलेला फलाट क्रमांक २ शुक्रवार, १५ सप्टेंबरपासून बंद केला. गणेशोत्सवात खरेदीसाठी दादरला पसंती दिली जाते. पण शुक्रवारी धीमी 'दादर लोकल' पकडणाऱ्या प्रवाशांना आता परळ स्थानक गाठावे लागले. ऐन सणासुलीला मध्य रेल्वेने हा बदल केल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या दादर स्थानकाला प्रवाशांची प्रथम पसंती असते. मुंबई दादर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. आहेत. किरकोळ खरेदीदारांपासून ते घाऊक खरेदीदारांपर्यंत सर्व जण दादरचीच निवड करतात. मात्र, सीएसएमटीहून प्रवाशांनी भरून येणाऱ्या लोकलमध्ये अवजड बॅगांसह प्रवेश करणे हे मोठे दिव्य असते.पण गणेशोत्सवात हा बदल झाल्याने प्रवाशांना फटका बसला.
गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात लोक खरेदीसाठी दादर येथे येतात. रेल्वेच्या कामाला विरोध नाही परंतु या कालावधीत हा बदल करणे चुकीचे होते. सणासुदीला असे काम करताना प्रवाशाना विचारत घेणे आवश्यक आहे. पण रेल्वेला प्रवाशांचे काहीही पडले नसून त्यांना केवळ काम करायचे आहे. आज मोठी गर्दी होती , या बदलामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ
दादर येथे फलाट क्रमांक १ समोर आणखी एक फलाट बांधण्याची सूचना आम्ही रेल्वे प्रशासनाला दिली होती. त्यानुसार केवळ एका युनियनचे कार्यालय हटवून हा फलाट बांधता आला असता. अतिरिक्त फलाट उपलब्ध झाल्याने गर्दीचा प्रश्न सुटला असता पण रेल्वे प्रशासनाने लाखो प्रवाशांपेक्षा युनियनला प्राधान्य दिले त्यामुळे हा गोंधळ होत आहे. सिद्धेश देसाई , सरचिटणीस ,मुंबई रेल प्रवासी संघ
ऐन गणेशोत्सव काळात हा बदल झाल्याने प्रवाशांचे हाल तर होणारच आहेत. मध्य रेल्वेने दादर येथील बदलाबाबत आज घोषणा केल्या पण या आठवड्यापूर्वीच करणे गरजेचे होते. ते केले असते तर आज गोंधळ झाला नसता पण रेल्वे प्रशासनाचा केवळ कामावर भर असून त्यांना प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयींशी काही देणे घेणे नाही. सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद.