दादर-माहीम मतदारसंघात धडधड वाढली़़़
By Admin | Published: February 22, 2017 07:34 AM2017-02-22T07:34:33+5:302017-02-22T07:34:33+5:30
दादर-माहीम मतदारसंघासाठी शिवसेना-मनसेमध्ये युद्धच पेटले आहे़ त्यामुळे या मतदारसंघातील प्रभागांकडे
मुंबई : दादर-माहीम मतदारसंघासाठी शिवसेना-मनसेमध्ये युद्धच पेटले आहे़ त्यामुळे या मतदारसंघातील प्रभागांकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे़ मतदानाच्या दिवशीही या प्रभागांमध्ये उत्साह दिसून येत होता़ शिवसेनेचे मुख्यालय असलेले शिवसेना भवन आणि मनसेचे मुख्यालय राजगड या परिसरातही कार्यकर्त्यांची गर्दी होती़ आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी उभय पक्षांचे कार्यकर्ते जिवाचे रान करीत होते़
दक्षिण मध्य मुंबई म्हणजे काही प्रभागांचा अपवाद वगळता शिवसेनेचा बालेकिल्लाच़ मात्र मनसेची स्थापना झाल्यानंतर येथे शिवसेनेला हादरे बसू लागले़ अन् २०१२ मध्ये शिवसेना येथून हद्दपारच झाली़ माहीम, दादर येथील गडावर मनसेचा झेंडा फडकला़ बालेकिल्ल्यातच असे हद्दपार होणे शिवसेनेसाठी शरमेचे ठरले़ तेव्हापासून गड परत मिळवण्यासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू झाली़ त्यामुळे मनसेपुढेही आव्हान वाढले़
या प्रभागांमध्ये दिग्गजांना उतरवून शिवसेनेने दंड थोपटले आहेत़ त्यामुळे मुंबईवर सत्ता कोणाची याबाबत जेवढी उत्सुकता मुंबईकरांमध्ये आहे तितकेच कुतूहल दादर-माहीमविषयी दिसून येत आहे़ मतदारांनीही या विभागामध्ये आज उत्साहात मतदानात सहभाग घेऊन या लढतीत रंगत आणली़ त्यामुळे दादर परिसर मतदार व कार्यकर्त्यांनी आज फुलला व गजबजला होता़ (प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांची फौज कामाला...
सकाळच्या दोन तासांमध्ये आठ टक्केच मतदान होत असल्याचे दिसल्यानंतर कार्यकर्त्यांची फौज कामाला लागली़ दादरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाचे उमेदवार असले तरी खरी लढत शिवसेना आणि मनसेमध्येच असल्याचे चित्र होते़ त्यामुळे आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी ही फौज शेवटचा मतदार इमारत व चाळीतून खाली उतरेपर्यंत कामाला लागला होता़
वासुदेवाची वाणी़़़
पारंपरिक वेशभूषेत सकाळच्या पारी भजन गात फिरणाऱ्या वासुदेवाने आज चक्क आपल्या दिनक्रमात बदल करून मतदारांना आवाहन केल्याचे चित्र दादर परिसरात होते़ वासुदेव राजू विधाते यांनी दादर शिवाजी पार्कसमोरच्या चौकामध्ये फेरी मारत मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन केले़
इमारतच मतदार
यादीतून गायब़़़
दादर पश्चिम येथील प्रभाग क्ऱ १९१ मध्ये पॉप्युलर निकेतन इमारतीमधील ३५ मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत. या मतदारांनी अनेक वेळा बालमोहन येथील मतदान केंद्रावर फेऱ्या मारल्या़ आजूबाजूच्या प्रभागातही चाचपणी केली़, परंतु कुठेच त्यांची नावे सापडली नाहीत़ त्यामुळे त्यांची घोर निराशा झाली़