दादर, माहीम, धारावीमध्ये अखेर रुग्णसंख्येत घट, उपाययोजनांचा परिणाम; प्रभागात सापडले ३९ बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 08:59 AM2021-05-11T08:59:12+5:302021-05-11T09:08:17+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावीमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली, तरीही मुंबईतील इतर विभागांच्या तुलनेत धारावीमध्ये रुग्णवाढ कमी होती. मात्र, दादर आणि माहीम परिसरात दररोज शंभरहून अधिक रुग्णांची नोंद होत होती.
मुंबई : दादर, माहीम आणि धारावी अशा मुंबईतील मध्यवर्ती व गजबजलेल्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा प्रचंड वाढला होता. मात्र, त्वरित चाचणी, तात्काळ निदान आणि योग्य उपचार या उपाययोजनांचा प्रभाव पुन्हा एकदा जी उत्तर विभागात दिसून येत आहे. गेले काही दिवस दररोज शंभरहून अधिक रुग्णसंख्या असलेल्या या विभागात सोमवारी ३९ बाधित रुग्ण सापडले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावीमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली, तरीही मुंबईतील इतर विभागांच्या तुलनेत धारावीमध्ये रुग्णवाढ कमी होती. मात्र, दादर आणि माहीम परिसरात दररोज शंभरहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. त्यामुळे या परिसरात चाचणीचे प्रमाण वाढविण्यात आले. दादर
आणि माहीम परिसरातील दुकानदार, फेरीवाले व नागरिकांची चाचणी करण्यात आल्यामुळे तात्काळ निदान करून विलगीकरण केले जात आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले. या विभागातील रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर पुन्हा एकदा पालिकेने जुन्या उपाययोजना अमलात आणल्या. त्याचे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत.
आजची रुग्णसंख्या
परिसर आतापर्यंत सक्रिय आजचे रुग्ण
दादर ९१३३ १५६० ०४
धारावी ६६३२ ७२७ ०९
माहीम ९३३९ १७०९ २६