Join us

दादर मार्केट पुन्हा बीकेसी, सोमय्यात; कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना, महापौरांनी बोलावली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 10:22 AM

नाशिक, पुणे येथून सुमारे दोनशे घाऊक व्यापारी दररोज दादर पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर भाजीपाला, फळ घेऊन येत असतात. सकाळी ४ ते ९ या वेळेत याठिकाणी भाजी खरेदीसाठी घाऊक व्यापाऱ्यांची मोठी गर्दी होते.

मुंबई : गेल्या महिन्यापासून मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. अशावेळी मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादर परिसरातील गर्दी मोठे आव्हान ठरत आहे. या भागातही दररोजच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून येत असल्याने दादर येथील बाजारपेठ वांद्रे कुर्ला संकुल, सोमय्या मैदानावर हलवण्यात येणार आहे. याबाबत पालिका मुख्यालयातील महापौर किशोरी पेडणेकर यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नाशिक, पुणे येथून सुमारे दोनशे घाऊक व्यापारी दररोज दादर पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर भाजीपाला, फळ घेऊन येत असतात. सकाळी ४ ते ९ या वेळेत याठिकाणी भाजी खरेदीसाठी घाऊक व्यापाऱ्यांची मोठी गर्दी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी गेल्यावर्षी मार्च महिन्यात सेनापती बापट मार्गावर सुमारे दोनशे पिचेसची आखणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही दररोज सकाळी या ठिकाणी घाऊक व्यापारी दाटीवाटीने भाजीपाला खरेदी करीत असताना आढळून आले. याची गंभीर दखल घेत दादर रेल्वेस्थानक येथील भाजी मार्केट २९ मार्चपासून तात्पुरती स्वरूपात बंद करण्यात आली होती. या मार्केटचे उपनगरामध्ये पाच ठिकाणी स्थलांतर करण्यात आले होते. 

दोन आठवड्यात झपाट्याने वाढले रुग्णलॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्यानंतर दादर येथील बाजारपेठेत पुन्हा गर्दी होऊ लागली. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांत दादरमध्ये रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत, सध्या या परिसरात २०२ सक्रिय रुग्ण आहेत. तर बुधवारी २० बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे दादर बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात महापौर दालनात बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. 

गर्दी टाळा, नियम पाळागर्दी आणि कोरोना खबरदारीचे नियम पाळले जात नसल्यामुळे कोरोना रुग्णवाढीला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावे, वारंवार हात धुवावे आणि मास्कचा वापर करावा, असे आवाहनही महापौरांनी केले. लग्नसोहळे, कार्यक्रम, अंत्यविधी-दशक्रिया विधीसाठी गर्दी करू नये, नियम काटेकोरपणे पाळावेत असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. दादर मार्केटमध्ये गर्दी वाढत असल्याने त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी भाजी आणिफुल मार्केट वांद्रे कुर्ला संकुल आणि सोमय्या मैदानावर हलविण्यात येणार आहे. - किशोरी पेडणेकर, मुंबईच्या महापौर 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई महानगरपालिकादादर स्थानक