दादर,माटुंग्यावर संंकट झाले गडद; कोरोनाचा प्रसार रोखण्याचे महापालिकेपुढे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 01:50 AM2020-05-26T01:50:33+5:302020-05-26T01:50:58+5:30
जी उत्तर विभागात आतापर्यंत २२०० रुग्ण
मुंबई : धारावीप्रमाणेच दक्षिण-मध्य मुंबईतील माहीम, दादर, सायन, माटुंगा या भागांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. जी उत्तर विभागात आतापर्यंत तब्बल २२०० रुग्णांची नोंद झाली आहे.
यापैकी एकट्या धारावी विभागात १५८३ रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबई कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. साडेआठ लाख लोकसंख्या असलेल्या या झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. यासाठी ‘मिशन धारावी’ आणि ‘फिव्हर क्लिनिक’च्या माध्यमातून बाधित क्षेत्रातील सर्व रुग्णांना तपासून संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बिगरशासकीय संस्थांच्या माध्यमातून आजारी रुग्णांना पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
तसेच सायन, माटुंगा, वडाळा, अँटॉप हिल, माहीम या भागांमध्ये वाढत्या रुग्णांची संख्या चिंतेचा विषय बनली आहे. माहीम परिसरात सोमवारी ३४ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर दादर परिसरात २० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एफ उत्तर विभाग म्हणजेच सायन, वडाळा, माटुंगा भागात सोमवारपर्यंत १६४२ रुग्णांची नोंद झाली आहे. या परिसरातही मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या विशेषत: अँटॉप हिल परिसर येथे कोरोनाचा प्रसार रोखणे मोठे आव्हान ठरू लागले आहे.
जी उत्तर विभाग
एकूण रुग्ण डिस्चार्ज
धारावी १५८३ ५९९
माहीम ३१७ ८२
दादर २१९ ९५