Join us

दादरमध्ये पोलीस हवालदाराला मारहाण

By admin | Published: May 11, 2016 3:40 AM

टॅक्सीचालक आणि तीन दुचाकीस्वारांमध्ये सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी पुढे गेलेल्या पोलीस हवालदाराला मारहाण झाल्याची घटना सोमवारी दादर येथे घडली

मुंबई : टॅक्सीचालक आणि तीन दुचाकीस्वारांमध्ये सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी पुढे गेलेल्या पोलीस हवालदाराला मारहाण झाल्याची घटना सोमवारी दादर येथे घडली. दुर्दैवी बाब म्हणजे, तेथे उपस्थित असलेल्या टॅक्सीचालकांनी त्यांना यातून वाचविण्यापेक्षा बघ्याची भूमिका घेतली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गणपत चव्हाण पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी रात्री ते शिवसेना भवन येथे ते कर्तव्यावर होते. रात्री दीडच्या सुमारास येथील पेट्रोलपंपाकडे तीन दुचाकीस्वार तरुण टॅक्सीचालकासोबत वाद घालत होते. दोघांमधील भांडण सोडविण्यासाठी चव्हाणने त्यांच्याकडे धाव घेतली. याचाच राग धरत, तिघा तरुणांनी चव्हाण यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी, तेथे उभ्या असलेल्या टॅक्सीचालकांनी पोलिसाला यातून सोडविण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली किंवा पोलिसांनाही याबाबत सूचित केले नाही. नंतर पोलिसाला तेथेच सोडून तिघांनीही तिथून पळ काढला. हा प्रकार तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. चव्हाण यांच्याकडून घटनेची माहिती मिळताच, शिवाजी पार्क पोलीस तेथे दाखल झाले. सीसीटीव्हीमध्ये येथील एका तरुणाचा दुचाकी क्रमांक सीसीटीव्हीमध्ये दिसला. त्यानुसार, पोलिसांनी शोध घेत, या तिघांच्याही मुसक्या आवळल्या. अक्षय महादेव अंसुरकर (१९), अनिकेत महादेव अंसुरकर (२३) आणि संतीकेश राम राठोड अशी अटक आरोपींची नावे आहेत. यापैकी अंसुरकर बंधू प्रभादेवी, तर राठोड हा विलेपार्ले येथे राहतो.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांनाही केईएम रुग्णालयात जायचे होते. मात्र, बाईक सोबत असतानाही टॅक्सीतून जाण्याचा आग्रह धरत असल्याने, टॅक्सीचालकाने त्यांचे भाडे नाकारले. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू असल्याचे समोर आले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. तिघांकडेही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त महेश पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)