यंदाच्या पावसाळ्यात तुंबणार नाही दादर टी. टी. परिसर; जलवाहिन्यांचे काम अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 12:57 AM2020-03-08T00:57:23+5:302020-03-08T01:07:35+5:30
दादर पूर्व टीटी परिसर हा मुंबईच्या बहुतांशी भागांप्रमाणे समुद्रसपाटीपासून खोलगट भागात येतो.
मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या दादर पूर्व येथील टी.टी. परिसराला अखेर दिलासा मिळणार आहे. या भागातील २० पर्जन्य जलवाहिन्यांचे काम अंतिम टप्प्यात आल्याने पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता दुप्पट होणार आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
मुंबईचा मध्यवर्ती भाग असलेल्या दादर पूर्व येथील ‘दादर ट्राम टर्मिनस’ परिसरात अतिवृष्टी झाल्यास अनेकवेळा पाणी तुंबते. बºयाच वेळा या पाण्याचा निचरा होत नसल्याने येथून जाणारी वाहने, नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी दादर टीटी आणि आसपासच्या भागातील २० पर्जन्यजल वाहिन्यांचे पुनर्बांधकाम व सक्षमीकरण २०१८ पासून सुरू करण्यात आले आहे.
यामध्ये नऊ हजार १५३ फूट लांबीच्या २० पर्जन्य जलवाहिन्यांपैकी आठ हजार ४६४ फूट लांबीच्या १९ पर्जन्यजलवाहिन्यांची कामे आता अंतिम टप्प्यात असून ती येत्या पावसाळ्यापूर्वी होणार आहेत. या पर्जन्य जलवाहिन्यांचे काम सुधारित आराखड्यानुसार करण्यात आल्यामुळे त्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता दुपटीने वाढणार आहे. त्यामुळे पूर्वी दर तासाला २५ मि.मी. पाऊस पाणी वाहून नेणाºया या वाहिन्यांची क्षमता ताशी ५० मि.मी. होणार आहे.
कायमचा तोडगा काढण्यासाठी नियोजन
दादर पूर्व टीटी परिसर हा मुंबईच्या बहुतांशी भागांप्रमाणे समुद्रसपाटीपासून खोलगट भागात येतो. त्यामुळे ऐन भरतीच्या वेळी अतिवृष्टी झाल्यास पर्जन्य जलवाहिन्यांमधून पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाण्यास अटकाव निर्माण होतो.
यामध्ये संबंधित परिसरातील नऊ हजार १५४ फूट लांबीच्या २० पर्जन्य जलवाहिन्यांचे बांधकाम टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात आले आहे.
दादर पूर्वच्या अनेक भागात पाणी साचते. त्यामुळे पर्जन्य जल खात्याच्या माहितीनुसार, पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढविण्यात आली आहे. या भागाची पाणी साचण्यातून कायमची सुटका करण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्यात येत आहे.