मुंबई : बहुचर्चित असा परेल टर्मिनसचा प्रकल्प पूर्ण होणार की नाही यावरून सध्या जोरदार चर्चा रंगलेली असतानाच हा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी १५ दिवसांत निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. परेल टर्मिनसमुळे दादर स्थानकातून सुटणाऱ्या लोकलचा ताण बराचसा कमी होईल, अशी आशा रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. एमआरव्हीसीमार्फत (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) एमयूटीपी-२ अंतर्गत सीएसटी ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गाच्या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे. एमयूटीपी-२ अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांची कामे २0१४ च्या अखेरीस पूर्ण केली जाणार होती. मात्र निधीच उपलब्ध होत नसल्याने अनेक कामे रखडली होती. यात सीएसटी ते कुर्ला या पाचव्या-सहाव्या मार्गाचा समावेश होता. एकूण ९00 कोटी रुपये किंमत असलेल्या या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने प्रकल्पाचे कामच सुरू झाले नव्हते. या कामाच्या खर्चाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पडून होता. पाचव्या-सहाव्या मार्गाच्या या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाकडून मागील वर्षीच्या १0 सप्टेंबर रोजी मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर दादर स्थानकातील लोकलचा वाढता भार कमी करण्यासाठी म्हणून परेल टर्मिनसचा नवीन प्रस्तावही मध्य रेल्वेकडून तयार करण्यात आला. पाचव्या-सहाव्या मार्गाच्या प्रस्तावातच या प्रस्तावाला समाविष्ट करण्यात आले. परेल टर्मिनससाठी ८0 कोटी रुपये खर्च येणार असून मंजूर करण्यात आलेल्या ९00 कोटी रुपयांच्या खर्चात परेल टर्मिनसचाही खर्च समाविष्ट करण्यात आला. परंतु निधीअभावी प्रकल्पांची कामे सुरूच होऊ शकली नाही. त्यामुळे दोन्ही प्रकल्प जवळपास बासनात गुंडाळण्याची तयारी सुरू केली गेली. मात्र आता पुन्हा एकदा या दोन्ही प्रकल्पांना गती देतानाच परेल टर्मिनसला सर्वाधिक प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची पंधरा दिवसांत निविदा खुली होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महानगर वाहतूक रचना विभागाचे मुख्य अभियंता (बांधकाम) ए.के. अग्रवाल यांनी दिली.
दादरवरील ताण कमी होणार
By admin | Published: August 20, 2015 2:04 AM