लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादर येथील वर्दळीचा टिळक पूल आता केबलचा असणार आहे. दादर पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या या पुलाचे काम अडीच वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासाठी तब्बल ३७५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या नवीन पुलाची एकूण रुंदी १७.१ मीटर इतकी असेल. तसेच या पुलाची क्षमता आताच्या पुलापेक्षा दुप्पट राहणार आहे.
दादर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा पूल महत्त्वाचा असल्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम लांबणीवर पडले होते. मात्र या ठिकाणी सध्याच्या पुलाला समांतर केबल ब्रीज बांधण्याचा निर्णय पालिकेच्या पूल विभागाकडून घेण्यात आला आहे. या पुलाचे काम ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ (एमआरआयडीसी)कडून केले जाणार आहे. या कामासाठी महामंडळाला पालिका आणि रेल्वे मंत्रालयाकडून निधी देण्यात येणार आहे.
प्रस्तावित टिळक पूल हा वांद्रे सी-लिंकच्या धर्तीवर बांधला जाणार आहे. हा पूल साधारण ६५० मीटर असून त्यापैकी केबलवर आधारित भाग सुमारे १९० मीटरपर्यंत असेल. सध्याचा पूल सुमारे ४.५ मीटर उंचीचा असून नवीन पूल हा त्यावर समांतर पद्धतीने बांधला जाणार आहे. त्यामुळे पुलाची उंची वाढणार असली तरीही जमिनीवर उतरण्यासाठी रॅम्पची व्यवस्था केली जाणार आहे.